* आमदार गायकवाड यांच्याकडूनच शिवरायांचा अपमान : शिवराज मोरे
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ आणि राजमाता जिजाऊ साहेबांचे माहेर हे बुलढाणा आहे. या ठिकाणाहून महाराजांचे विचार आणि आचार पुढे नेले पाहिजेत. त्यांचा सुसंस्कृतपणाचा वारसा जपला गेल्या पाहिजे. मात्र या ठिकाणचे स्थानिक आमदार संजय गायकवाड यांनी शिवरायांचा खऱा इतिहास घरा-घरामध्ये पोहोचवणाऱ्या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखीत 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, त्यांच्या आई-बहिणीवर आणि पत्नीवर ज्या प्रकारे ते बोलले, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण नक्कीच नाही ? येणाऱ्या काळात आम्ही अशी लाखो पुस्तके महाराष्ट्रात वाचून महाराजांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवू. येथील लोकप्रतिनिधी आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा शहराची मान खाली घालण्याचे आणि महाराजांचा अपमान करण्याचे काम केले असल्याचा हल्लाबोल युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी केला.
बुधवार २९ एप्रिल रोजी युवक काँग्रेसच्या वतीने बुलढाण्यातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर आमदार संजय गायकवाड यांच्या बेताल विधानांचा निषेध करत शिवाजी कोण होता? पुस्तकाचे वाचन करण्यात आले. पुढे बोलतांना शिवराज मोरे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला धक्का लावण्यासाठी, त्यांची प्रतिमा ढासळण्यासाठी गेल्या आठवड्या भरापासून या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक मालिकाच सुरू असल्याचे आपण पाहत आहोत. काही दिवसांपूर्वी बागेश्वर महाराज असतील किंवा आजचे दुसरे कोणी महाराज असतील, हे सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा डागाळण्याचे आणि त्यांना कमी लेखण्याचे प्रयत्न करत आहेत. युवक काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही सबंध महाराष्ट्राला सांगू इच्छितो की, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे आदर्शस्थान आमच्यासाठी दुसरे कोणीही नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी महाराजांचा इतिहास आणि पराक्रम पुसता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, क्रांतीज्योती जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र टिकवण्यासाठी आमचा संघर्ष असाच सुरू राहील.
यावेळी विभागीय प्रभारी आणि उपाध्यक्ष अनुराग भोयर, प्रदेश उपाध्यक्ष कपिल ढोके, संघटन सरचिटणीस प्रविणकुमार बिरादार, काँग्रेस नेते संदीप दादा शेळके,रीजवान सेठ सौदागर, दत्ताभाऊ काकस ,गझनफर खान,प्रदेश सरचिटणीस विश्वदीप पडोळ, , प्रदेश सचिव नेहल देशमुख, प्रदेश सचिव शिवराज पाटील, जिल्हा संघटक अतुल सिरसाठ,खामगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील ठाकरे, ज्ञानेश्वर पचांगे, श्याम सर, शेख इरफान प्रदेश सचिव वशीम कुरेशी, प्रदेश सचिव इरफान पठान, संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष विश्वास औताडे, संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष सागर नागरे, जालना जिल्हाध्यक्ष राहूल देशमुख व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
* द्वेष पसरवणाऱ्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा : संदिप दादा शेळके
छत्रपती शिवरायांचा मावळा कधीही महाराजांच्या सन्मानाशी तडजोड करणार नाही. मात्र धर्माच्या नावाखाली युवकांना भडकावण्याचे काम सत्ताधारी सातत्याने करत आहे. इतिहास हा त्या- त्या काळाच्या संदर्भानुसार अभ्यासायचा असतो. शिवसेना पक्षाची घोषणा जय भवानी, जय शिवाजी आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी दगलबाज शिवाजी हे पुस्तक लिहिले आहे. इतिहास संशोधक, लेखकांची भूमिका ही आदरयुक्तच असते. द्वेष पसरवणाऱ्यांनी आधी इतिहास समजून घ्यावा, असा सल्ला काँग्रेस नेते संदिप दादा शेळके यांनी दिला.
