राजे छत्रपती महाविद्यालयात माहिती अधिकार सप्ताहानिमित्त कार्यशाळा

राजे छत्रपती महाविद्यालयात माहिती अधिकार सप्ताहानिमित्त कार्यशाळा 
धामणगाव बढे : (एशिया मंच वृत्त)
       जिल्हाधिकारी यांच्या आवाहनानुसार जिल्ह्यात  ६ ते १२ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान माहिती अधिकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यामध्ये पथनाट्ये, प्रश्नमंजुषा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चर्चासत्रे, व्याख्याने, कार्यशाळांचे , आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. माहिती अधिकार अधिनियम २००५ कायद्याची अंमलबजावणी देशभरात  १२ ऑक्टोबर २००५ पासून करण्यात आली, या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व नागरिकांचा सहभाग वाढण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
       या सप्ताहानिमित्त राजे छत्रपती कला महाविद्यालय धामणगाव बढे येथे  ७ ऑक्टोबर २०२३ रोजी माहीती अधिकारावर आधारित वस्तुनिष्ठ स्वरूपात ऑनलाईन व ऑफलाईन पेपरचे आयोजन करण्यात आले होते, ऑनलाईन पेपरमध्ये जवळपास दोनशे विद्यार्थ्यांनी आजपर्यंत सहभाग नोंदविला असून यामध्ये पिंजर, अकोला, परभणी, अमळनेर, जळगाव, चिखली यासारखे राज्य भरातील विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या पेपरचा उद्देश जनजागृती हा असून या पेपरची लिंक ११ आक्टोबर पर्यंत ओपन असणार आहे. त्याचप्रमाने  ९ ऑक्टोबर रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे आयोजन अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. महादेव रिठे यांनी प्राचार्य डॉ. अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नॅकचे समन्वयक प्रा. शशिकांत सिरसाट यांनी करतांना सांगितले की, भारतामध्ये हा कायदा लागू करण्यापूर्वीची स्थिती आणि वर्तमान कालीन स्थितीत प्रशासकीय कामकाजात सुधारणा झाल्याचे दिसून येते. प्रमुख मार्गदर्शक डॉ. गजानन वानखडे यांनी भारतीय राज्यघटना व माहीती अधिकार कायदा यावर भाष्य करतांना सांगितले की, आपल्या अधिकारांची जाणिव आपल्याला असेल तर या कायद्याचा योग्य वापर करून आपले अधिकार आपल्याला प्राप्त करून घेता येतात. डॉ. महादेव रिठे यांनी माहीती अधिकाराच्या वापराबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना माहीती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. नितीन जाधव यांनी आपल्या राज्यघटनेतील मुलभूत अधिकारांच्या माहितीचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला तर भविष्यात माहिती अधिकाराचा वापर करण्यासाठी योग्य दिशा मिळेल. कार्यक्रमाचे संचालन कु. वैष्णवी मोदे तर आभार प्रदर्शन कु. तनवी कोठाळे हिने केले.