* राजूर घाटातील घटना
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
भरधाव एसटी बस चे अचानक ब्रेक फेल झाल्याने राजूर घाटात मलकापूरला जाणाऱ्या एसटी बसला अपघात होऊन 4 जण किरकोळ जखमी झाल्याची घटना रात्री 7.30 वाजेच्या सुमारास राजूर घाटातील हनुमान मंदिर जवळील वळणावर घडली.
सदर घटनेबाबत मिलेली माहिती अशी की, बुलडाणा येथून मलकापूर कडे जात असलेल्या भरधाव एसटी बस (एमएच ४०-एन-८१७१) चे हनुमान मंदिर जवळील वळणावर अचानक ब्रेक फेल झाल्याने राजूर घाटात अपघात झाला असुन यामध्ये 4 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. वेळप्रसंगी चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे माेठी दुर्घटना टळली. अन्यथा ही बस थेट दरीत कोसळली असती. दरम्यान 5 ते 5.30 किमीच्या अंतरावरील राजूर घाटात हनुमान मंदिराजवळ बसचे ब्रेक निकामी झाल्याचे बस चालकाच्या लक्षात आले. नेमक्या वळणवरच हा प्रकार घडला. थोडी जरी चूक झाली असती तर बस काही क्षणात दरीमध्ये कोसळली असती. परंतू चालकाने प्रसंगावधान राखत ही बस रस्त्याच्या डाव्या बाजूला घेत पाण्याचा निचरा होण्यासाठी खोदलेल्या नालीत घुसवली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
सदर अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान या अपघातामध्ये जिजाबाई सिद्धार्थ नरवाडे (रा. घुस्सर, ता. मोताळा) ही महिला जखमी झाली असून तिच्यासह अन्य तिघे जखमी झाले आहे. त्यांची माहिती मिळू शकली नाही. सर्व जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
