* जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांची पत्रकार परिषदेत मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
खारघर येथे 16 एप्रील 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळयादरम्यान उष्माघाताने चौदा निष्पाप श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. ही घटना मनाला वेदना देणारी आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातून लाखो श्रीसदस्य उपस्थित झाले होते. सरकारने या कार्यक्रमासाठी शासकिय तिजोरीतून तेरा कोटी रूपये खर्च केले. मात्र कार्यक्रमासाठी हजर झालेल्या श्रीसदस्यांसाठी तंबूची उभारणी करण्यात न आल्याने कडकत्या उन्हात श्रीसदस्यांना कार्यक्रम बघावा लागला त्यामुळे त्यांचा वेदनादायी मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यासोबतचं या प्रकरणी विधी मंडळाचे दोन दिवशीय विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी जिल्हा कॉग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषदेतून केली.
यावेळी पत्रकार परिषदेला श्यामभाऊ उमाळकर, आमदार धीरज लिंगाडे, जयश्रीताई शेळके, सुनील सपकाळ हे उपस्थित होते.
स्थानिक काँग्रेस कमिटी कार्यालयात आज 24 एप्रील 2023 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देतांना राहुल बोंद्रे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण हा शासकिय सोहळा होता. त्यामुळे तो राजभवनातही आयोजित करता आला असता मात्र, भाजपा ने आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या श्रीसदस्यांच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर शक्ती प्रदर्शन दाखविण्यासाठीचं हा सोहळा खुल्या मैदानावर एप्रील महिन्यातील दुपारच्या कडकत्या उन्हात घेतल्याचा आरोपही ही बोंद्रे यांनी केला. दुपारी दिड वाजता कार्यक्रम संपला मात्र त्यापुर्वीचं लोकांमध्ये चलबिचल सुरू झाली होती. काहींना भोवळ आली मात्र अशा स्थितीतही कार्यक्रम सुरूचं ठेवण्यात आला. श्रीसदस्यांसाठी पाण्याची पुरेशी सुविधा नव्हती. कार्यक्रमानंतर एकचं धावाधाव झाली. चेंगराचेंगरी झाली. सरकारच्या आकडेवारीनुसार 14 जणांचा मृत्यू झाला मात्र ही आकडेवारी 50 पेक्षा अधिक आहे तर पाचशे पेक्षा अधिक लोक उपचार घेत आहेत. सरकारने मृतकांच्या वारसांना 5 लाख रूपये देण्याची घोषणा केली असली तरी याने प्रश्न सुटत नाही. एखादया कार्यक्रमात दुर्घटना घडली तर आयोजकांवर गुन्हा दाखल केला जातो मग आयोजक सरकारवर या प्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्हा का? दाखल केला जात नाही असा सवाल ही बोंद्रे यांनी उपस्थित करून या घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राजिनामा देण्याची मागणीही त्यांनी केली.
