विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या मास्तरला चोप* लोणी गवळी येथील घटनेबद्दल सर्वस्तरातून संताप

विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या मास्तरला चोप
* लोणी गवळी येथील घटनेबद्दल सर्वस्तरातून संताप
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
       चिमुकल्या विध्यार्थीनींसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मास्तरला नागरिकांनी चांगलाच चोप दिला. तालुक्यातील लोणी गवळी येथे ८ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेबद्दल सर्वस्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

        लोणी गवळी येथील शाळेत महादेव आत्माराम मानतोडे (वय ५८) नावाच्या विकृत शिक्षकाने शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे कृत्य केले. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणाऱ्या तिसऱ्या वर्गातील तीन मुलींचा विनयभंग केला. मागील काही काळापासून त्याच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या काही मुलींसोबत हे घाणेरडे कृत्य या शिक्षकाने केले. या प्रकाराबद्दल कुठे काही वाच्यता केल्यास तो जीवाने मारण्याच्या धमक्या द्यायचा. यामुळे भयभीत झालेल्या मुलींनी ही घटना कोणाला सांगितली नाही. दरम्यान ८ एप्रिल रोजी या विकृताने तीन मुलींसोबत लैंगिक चाळे केले. शिक्षकाच्या या कृत्याबद्दल मुलींनी आपल्या आई, वडिलांना ही घटना सांगितली. संतापलेल्या पालकांनी सकाळी दहा वाजता शाळा गाठून मास्तरची चांगलीच धुलाई केली. घटनेबद्दलची माहिती समजताच डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमरनाथ नागरे आपल्या सहकाऱ्यांसह शाळेत पोहोचले. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे हेदेखील दाखल झाले. राखीव पोलीस दलसुद्धा पोहोचले. यावेळी शाळा आणि गावात तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय अधिकारी खाडे यांनी पालकांची समजूत काढली. यावेळी आरोपी मास्तरला डोणगाव पोलीस ठाण्यात नेण्यात आले. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.