* संपुर्ण घटना सीसीटिव्हित कैद
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
शहरात आपले लाखोचे वाहने सुरक्षीत आहे काय? असा प्रश्न आता चारचाकी मालकांना पडला आहे. २३ एप्रिलच्या रात्री १.३० वाजेच्या सुमारास बुलडाणा शहरातील मच्छी ले-आऊट येथील रहिवासी शिक्षक सुनिल डोंगरे यांची २० लाख रुपये किमतीची महागडी कार अज्ञातांनी जाळून टाकली. कारवर पेट्रोल टाकून कार जाळतांना अज्ञात तिघेजण डोंगरे यांच्या घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
दरम्यान या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून, हा प्रकार शिक्षक डोंगरे यांच्याविषयी असलेल्या व्यक्तीगत व्देषापोटी केला गेला की अन्य कारणास्तव हे पोलीस तपासातून उजागर होणार आहे. अद्याप पोलीसांना आरोपींचा सुगावा मिळाला नसला तरी सीसीटिव्हित कैद झालेले आरोपी कारला जाळतांना स्पष्ट दिसत असल्याने पोलीस आरोपीचा लवकरचं शोध घेवून त्यांना चतुर्भूज करतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.
