* केनवड सरपंच निताताई गोळे यांचे दातृत्व : गावाची पाणी समस्या सोडविण्यासाठी घेतला निर्णय
रिसोड : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यातील मौजे केनवड येथील कायम भेडसावणारा पाणी प्रश्न मार्गी लागावा या करिता गावचे पालकत्व स्वीकारलेल्या सरपंच निताताई गणेशराव गोळे यांनी स्वतःच्या मालकीची २ गुंठे जमीन विनामूल्य ग्रामपंचायतीला खरेदी खत करून दान केली. त्यामुळे लवकरच पाणी प्रश्न मार्गी लागून नागरिक व विशेषतः महिलांची पाण्याच्या जाचातून मुक्तता होणार आहे.
केनवड येथील पाणी प्रश्न कायम पाचवीला पुंजलेला. काही वर्षापूर्वी गावालगत धरण बनल्याने काही प्रमाणात समस्या मिटली. मात्र उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचा सामना सातत्याने मानगुटीवर बसलेला. या वास्तवातून नागरिक व महिलांची सुटका व्हावी, हा ध्यास सरपंचपदी विराजमान झाल्याच्या दिवसापासून निताताई गोळे यांनी घेतला होता. त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुद्धा सुरु केले. अखेर आमदार अमित झनक यांचे माध्यमातून सरपंचांनी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडून तीन कोटी सात लक्ष रुपयाची योजना केनवड येथे प्रस्तावित करून घेतली. शासनस्तरावर संपूर्ण गावाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये १४ किलोमीटर एवढे अंतराचे नळ योजनेसाठी काम करावे लागणार आहे. प्रत्येक घरामध्ये नळ जोडणी, चौका-चौकात स्टॅन्ड उभारणी, गुरांसाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रत्येक समाज मंदिरासमोर नळ जोडणी असे अनेक उपक्रम या जन मिशन योजनेच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या अत्यारीत होणार आहेत. ही योजना गावात येत असतांना जागेची अडचण आली अन क्षणाचाही विलंब न लावता सरपंच निताताई गोळे यांनी आपल्या मालकीची जागा दान देत त्याची खरेदी सुद्धा ग्रामपंचायतीच्या नावे आज करून देत एक आदर्श निर्माण केला. याचा थोडादेखील अभिमान त्यांना नसून, एका सामूहिक कार्याचे समाधान त्यांना नक्कीच लाभले आहे.
सरपंच निताताई गणेशराव गोळे तथा सर्व सदस्य यांच्या सहकार्यातून ही जलजीवन मिशन योजना लवकर सुरू होईल, आणि लवकरात लवकर गावाच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लावणार असल्याचे सरपंच गोळे यांनी सांगितले.
* जाणीवेतून जल जीवनाचा प्रश्न :
केनवड गावाची प्रथम नागरिक असले तरी त्याआधी मी एक महिला आहे. नागरिक व महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठीच मी सरपंच पदावर विराजमान झाले. पाणी प्रश्नाची मला जाणीव असल्यानेच जल जीवन मिशन योजनेसाठी काँग्रेस नेते तथा सामाजिक कार्यकर्ते असलेले माझे जेठ संदीप गोळे यांनी त्यांची स्वमालकीची जागा दान दिली. गावाच्या विकासासाठी कौटुंबिक सहकार्य लाभत असल्यामुळे सहकारी सदस्य यांच्या पाठबळाने पाणी प्रश्न मार्गी लागत आहे.
* निताताई गोळे, सरपंच केनवड
