चिखली : (एशिया मंच वृत्त)
ॲड. शर्वरी तुपकर यांच्याबाबत अपशब्द वापरुन सोशल मीडियावर अपमानजनक पोस्ट व्हायरल करणे शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. गजानन मोरे, शिवाजी देशमुख, गोपीनाथ लहाने, नारायण गरड, विलास घोलप या पाच जणांविरुद्ध चिखली पोलीस ठाण्यात १९ एप्रिल २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात ॲड. शर्वरी तुपकर यांनी चिखली पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीत नमुद आहे की, ॲड. शर्वरी तुपकर ह्या गेल्या १९ वर्षांपासून बुलढाणा जिल्हा न्यायालयात वकीलीचा व्यवसाय करतात तर त्यांचे पती रविकांत तुपकर हे सामाजिक व राजकीय क्षेत्रामध्ये व प्रामुख्याने शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन लढत असतात. चिखली येथील व्यापारी गाडे यांच्या वतीने दिवानी न्यायालय बुलढाणा येथे प्रकरण दाखल केल्याचे निमित्त करुन गजानन मोरे, शिवाजी देशमुख, गोपीनाथ लहाने, नारायण गरड, विलास घोलप यांनी १५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता पत्रकार परिषदेत व समाज माध्यमांवर बोलतांना अश्लील भाषेत टिकाटिप्पणी केली तसेच अपमानजनक वक्तव्य केले. त्यानंतर व्हॉटस्ॲप, फेसबूक आदी सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट व्हायरल करुन चुकीचे आरोप केले आहे. अश्लाघ्य व बदनामीकरक शब्दांनी त्यांनी अपमानीत करण्यासह सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे कृत्य त्यांनी केले आहे. ॲड. शर्वरी तुपकर यांनी दिलेल्या या तक्रारीवरुन चिखली पोलिसांनी गजानन मोरे, शिवाजी देशमुख, गोपीनाथ लहाने, नारायण गरड, विलास घोलप यांच्याविरुद्ध भादंवि कलम २९४, ५०१, ५०९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. उसना आव आणून सोशल मीडियावर अपमानजनक शब्द वापरणारे या पाच जणांच्या चांगलेच अंगलट आले आहे
माझ्यावर आरोप करणाऱ्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरात देखील आई, पत्नी, मुली अशा महिला आहेत, त्यांच्या बाबतीत खालच्या पातळीवर अपशब्द वापरल्यास त्यांना काय वाटेल? माझाच काय, कोणत्याही महिलेचा अश्लील आणि अपशब्द वापरुन अपमान करणे, समाजमाध्यमांवर अपमानजनक पोस्ट व्हायरल करणे संयुक्तीक नाही. महिलांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे, राजकारण करतांना कोणत्याही महिलेविषयी लज्जास्पद वक्तव्य करणे पूर्णपणे चुकीचे आहे, महिलांविषयी अपशब्द वापरणाऱ्यांनी कायदेशीर कारवाईचा विचार करुनच बोलावे, यापुढे पुन्हा कुणी अशी घाणेरडी भाषा वापरल्यास त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा ॲड. शर्वरी तुपकर यांनी दिला आहे.
