* रविकांत तुपकर यांची मागणी; मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांना ८ कोटींचा फटका
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
मोताळा येथील सुरेश चांडक, अनुप चांडक व त्यांच्या सहकाऱ्यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना ७ ते ८ लाखांचा गंडा घातला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या व्यापाऱ्यांविरोधात तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद आहे की, मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल मोताळा येथील व्यापारी सुरेश चांडक, अनुप चांडक व त्यांच्या सहकाऱ्यांना विकला हेाता. सदर व्यापाऱ्यांनी आरटीजीएस करतो, काही दिवसांनी देतो असे म्हणत शेतकऱ्यांचे पैसे थकवले व आता सदर व्यापारी फरार झाले आहेत. या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना ७ ते ८ कोटींचा गंडा घातला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या सुरेश चांडक, अनुप चांडक व त्यांच्या सहकाऱ्यांवर कडक कारवाई होणे गरजेचे असून त्यांची खासगी संपत्ती जप्त करुन शेतकऱ्यांना पैसे मिळवून द्यावे, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. गेल्या काही वर्षांपासून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना फसविण्याचे प्रकार वाढत आहेत. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक आहे, असेही तुपकर यांनी निवेदनात म्हटले आहे.
* पैसे रोखीने मिळावे :
शेतकऱ्यांना माल दिल्यानंतर व्यापाऱ्यांचा आग्रह आरटीजीएस तसेच चेक, ऑनलाईन पैसे देण्यासाठी असतो परंतु त्या ऐवजी शेतकऱ्यांना रोखीने पैसे मिळणे आवश्यक आहे. माल दिल्यानंतर रोखीने पैसे मिळाल्यास शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे रोखीने मिळावे, यासाठी उपाय योजना करणे आवश्यक असून शेतकऱ्यांनीही रोखीनेच पैसे घ्यावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.
