मुंबई येथील आंदोलनात जुनी पेंशनसाठी शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहभागी व्हावे :
* माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
2005 पुर्वी नियुक्त व 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती पेंशन योजना लागु करण्यात यावी, या मागणीसाठी येत्या 3 मे पासून मुंबई येथे आझाद मैदानावर होणा-या बेमुदत धरणे आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
बुलडाणा येथील विश्रामगृह येथे 27 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत पञकार परिषद घेण्यात आली. या पञकार परिषदेला शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन उबरहंडे, सतिष बिलारी उपस्थित होते.
यावेळी माहिती देतांना माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे म्हणाले की,
1 नोव्हेंबर 2005 पासून पुढे नवीन नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यास नवीन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा 31 ऑक्टोंबर 2005 ला वित्त विभागाने आदेश काढला आहे. 29 नोव्हेंबर 2010 रोजी शालेय शिक्षण विभागाने आदेश काढून 31ऑक्टोंबर 2005 रोजीच्या वित्त विभागाच्या आदेशाची अमलबजावणी कशी करावे हे निर्देशित केले आहे. सदर दोन्ही आदेशात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतराविषयी कसलाही उल्लेख नाही तसेच आज पर्यंत सुध्दा तिसरा या संदर्भात शासन आदेश निघाला नाही.
महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सेवेच्या शर्ती विनियम अधिनियम 1977 अन्वये शाळांना वेतन अनुदान, इमारत अनुदान, वेतनेतर अनुदान, विशेष अनुदान अशी चार प्रकारची अनुदाने देय आहेत. परंतु वेतन अनुदान वगळता इतर कोणतीच अनुदाने शाळांना दिली जात नाहीत. त्यामुळे सर्वच शाळा वेतन अनुदानाशिवाय इतर 3 अनुदानापासून वंचित राहत आहेत म्हणजेच सर्व शाळा अशंत:अनुदान घेत आहेत. त्यामुळे 100 % वेतन अनुदान घेणाऱ्या शाळेला अनुदानित शाळा म्हणणे बरोबर ठरणार नाही. 30 एप्रिल 2019 ला तीन न्यायाधीशांनी केलेले मार्गदर्शन हे वरील कोणतेच मुद्दे व निर्णय विचारात न घेता केलेले दिसते. संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यापैकी काहीजण नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले आहेत. त्यांच्या संपूर्ण सेवेत पी.एफ कपात झालेला आहे. तसेच बहुतांश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची सेवा 25 वर्षेच बाकी आहेत. 31 मार्च 2023 च्या शासन आदेशाने 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त कर्मचा-यांना पेन्शनच्या अनुशंगाने काही लाभ मिळाले आहेत तरी वरील सर्व मुद्यांच्या विचार करता 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना नैसर्गिक न्यायाने जुनी पेन्शन मिळणेचा हक्क आहे.तरी वरील सर्व मुद्दे पाहता बुधवार 3 मे 2023 पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल, या बेमुदत धरणे आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे.
