* तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
मोताळा : (एशिया मंच वृत्त)
तालुक्यात २६ एप्रिल २०२३ रोजी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने गारपीटीसह हजेरी लावल्याने अनेक गावांना मोठा फटका बसला असून प्रचंड नुकसान झाले आहे.
या नुकसानीची २७ एप्रिल २०२३ रोजी भाजपा नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात अंत्री, वाघजाळ या गावांत झालेल्या नुकसानीची शेतकरी व ग्रामस्थां समवेत पाहणी केली. यावर्षी ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून अचानक येत असलेल्या वादळी वारे, विजा, पाऊस व गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे व ही नुकसानीची शृंखला सुरूच आहे. मोताळा तालुक्यात काल झालेल्या प्रचंड अवकाळी पाऊस, गारपीट व वादळी वाऱ्याने शेतातील उभी पिके नेस्तनाभूत झालेली आहे.
घरावरील टिनपत्रे उडाली असून घरांची ,जनावरांच्या गोठ्याची, घरातील कडधान्ये, किराणा समान यांची नुकसान होऊन संसाराच उघड्यावर पडले आहे. काही नागरिक किरकोळ जखमी झाले आहे. गावात विजेच्या तुटून ग्रामस्थ अंधारात आहे.
शेतात असलेली मका, कांदा, केळी, ज्वारी,कांदा बी, व काही प्रमाणात कपाशी व बागायती पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.
या नुकसानीची विजयराज शिंदे यांनी स्वतः बांधावर जाऊन तसेच गावात झालेल्या पडझडीची पाहणी केली व बाधीत शेतकऱ्यांना दिलासा दिला. याप्रसंगी बरचश्या गावात अद्याप पंचनामे करण्यासाठी सरकारी यंत्रणा पोहचल्या नसल्याचे लक्षात आले. यावेळी विजयराज शिंदे यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारीशी बोलून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना पाहणी दरम्यान केल्या आहे.
यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी तालुक्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई साठी शासनाकडे मागणी केली आहे.
पाहणी करते वेळी भाजपा जिल्हा सचिव महादेव शिराळ, सचिन शेळके, माजी सरपंच श्रीकृष्ण सुरडकर, ज्ञानेश्वर साबे, भास्कर हरमकार, कैलास पाटील, मधुकर जवरे, शिवाजी जवरे,भागवत साबे यांसह शेतकरी, ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
* जिल्हाधिकारी यांना निवेदन....
मोताळा तालुक्यात झालेल्या नुकसानी बाबत माजी आमदार विजयराज शिंदे यांनी लेखी निवेदन सादर करून अवकाळीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आग्रही मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
* शेतकऱ्यांना आवाहन..
शेतातील पिकांचे झालेल्या नुकसानीचे पीकविमा कंपनीकडे ऑनलाइन क्लेम शेतकऱ्यांनी त्वरित दाखल करावे असे आवाहन देखील शेतकऱ्यांना केले आहे.
