बुलडाणा येथील सहकार विद्या मंदिर येथे विज्ञान दिन साजरा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त) स्थानिक सहकार विद्या मंदिर, बुलडाणा येथे विज्ञान दिवस उत्साहात साजरा झाला. 28 फेब्रुवारी रोजी सहकार विद्या मंदिरमध्ये सी.व्ही. रमण यांच्या अनमोल कार्यानिमित्त विज्ञान दिन आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अर्बनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बुलडाणा अर्बनचे सुकेशजी झंवर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गाजरे, सहाय्यक अधिकारी रोडे व दैनिक सकाळ चे बुलडाणा जिल्हा संपादक अरुण जैन उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्याचे स्वागत डॉ. सुकेशजी झंवर यांनी केले. याप्रसंगी मान्यवरांनी विज्ञान दिनाचे महत्व विषद करुन आपल्या भारतीय परंपरेचे संवर्धन करित आधुनिकतेची कास धरावी असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. विज्ञानामुळे सर्वसामान्यांचे जीवन कसे सुखकर करता येईल याचा विचार करावा असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. आधुनिक जगात भारताचे विद्यार्थी विज्ञान क्षेत्रात प्रचंड यश मिळवित आहे. जगातील नामवंत संस्थामध्ये भारतीय वैज्ञानिक यशाचा झेंडा रोवत आहेत. विज्ञानाने संपूर्ण जग बदलले आहे. कित्येक असाह्य आजारांवर औषधे, तंत्रज्ञान, सैन्य उपकरण यासह विविध पायाभुत सुविधामुळे नागरिकाचे जीवन सुसह्य झाले आहे.
यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रदर्शनीला भेट देत त्याचा उत्साह वाढविला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी ज्या कल्पकतेने विविध विज्ञान प्रोजेक्ट सादर केले होते. ते कौतुकास्पद होते. वर्ग 8 वी व 9 वी च्या विद्यार्थ्यांनी विविध प्रोजेक्टस सादर केले होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह, पालकांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवित विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी, प्राचार्य, मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.