आईच्या निधनानंतरही भाऊ उभा राहिला विधवांच्या रक्षाबंधनाला !

आईच्या निधनानंतरही भाऊ उभा राहिला विधवांच्या रक्षाबंधनाला !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       "स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी" या शब्दात कवीने आईच्या अस्तित्वाचे महत्व विषद केले आहे. जन्मदात्या आईचे निधन ही माणसाच्या आयुष्यातील अतिशय दुःखद घटना. आईचे छत्र हरवले की माणूस जसा काही पोरकाच होऊन जातो. दुःखाचा डोंगर कोसळणे म्हणतात ते अनुभवण्याचा क्षण म्हणजे आईचे निधन. या दुःखाच्या सावटात बहिणीचा आलेला सण अन् त्या सणातही कर्तव्य भावनेने भावाने केलेले रक्षाबंधन चर्चेचा विषय झाले आहे. विधवा महिलांचा हक्काचा भाऊ ठरलेले प्रा. डी.एस. लहाने यांनी परवा विधवा बहिणी सोबत रक्षाबंधन करून आपल्या दिवंगत मातेला प्रगल्भ सामाजिक जाणीवेची अनोखी आदरांजली अर्पित केली आहे.

        शिवशाही परिवाराचे आधारस्तंभ व मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डी. एस. लहाने यांच्या मातोश्री राजकोर बाई लहाने यांचे नुकतेच निधन झाले. हे निधन होऊन कुठेतरी चार-पाच दिवस झाले नाहीत तोच बहिण भावाच्या नात्याचा पवित्र क्षण रक्षाबंधन येऊन ठेपला. या दिवशी बहिण भावाच्या हातावर राखी बांधते आणि वर्षभर त्याच्याकडून पाठीशी उभ राहण्याचे वचन घेते. प्रेमाचा, आपुलकीचा हा सण आला मात्र प्रा.लहाने मातृशोकात होते. त्यांचे मूळ गाव लव्हाळा या गावी ते सध्या वास्तव्याला आहे. या ठिकाणी आईचे अंतिम संस्कार पार पडले. रक्षाबंधनाच्या दिवशी प्रा. लहाने गावात असल्याने परिसरातील विधवांनी राखी घेऊन जात तिथेच रक्षाबंधन केले. दिवसभर शेकडो विधवा बहिणी आपल्या हक्काच्या भावाच्या हातावर राखी बांधून एक प्रकारे त्यांचे दुःख वाटून घेत होत्या. या क्षणाने प्राध्यापक लहाने गहिवरून गेले. विधवा महिलांसाठी विवाह सोहळे,विधवांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी त्यांचे प्रयत्न, शासन दरबारी सुरू असलेला लढा हा सर्व परिचित आहे. 
       महापुरुषांच्या पावलावर पाऊल टाकत प्रा. लहाने सध्या विधवांचे हक्काचे भाऊ ठरले आहे. त्या विधवा बहिणींनी या दुःखद प्रसंगातही हातावर राख्या बांधून त्याचं दुःख वाटून घेत त्या हक्काच्या भावाच्या पाठीशी उभ्या राहिल्या.