* केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दाखवली हिरवी झेंडी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही वंदे भारत ट्रेन ही महत्वपूर्ण ठरणार आहे. या ट्रेनमुळे दोन महानगरे जोडली जाणार असून प्रवाशांच्या वेळेची बचत होणार आहे. जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल असा आशावाद केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केला.
नागपुर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला संत नगरी शेगांव मध्ये थांबा मिळवुन देण्याचे काम केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे. आज 10 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते या रेल्वे गाडीला दूरदृश्य प्रणाली द्वारे हिरवी झेंडी दाखविण्यात आली. त्यानंतर ही वंदे भारत ट्रेन संतनगरी शेगांव येथे पोचली तेव्हा या वंदे भारत ट्रेनच्या स्वागतासाठी केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव स्वतः उपस्थित होते. त्यांनी वंदे भारत ट्रेनमधील प्रवाशांशी संवाद साधला व प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या.
शेगाव रेल्वे स्थानकावरून वंदे भारत ट्रेनला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी आमदार संजय कुटे, रेल्वे स्थानक प्रमुख मोहन देशपांडे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते. गजानन महाराज की जय घोषणात या ट्रेनचे स्वागत करण्यात आले, त्यानंतर ही ट्रेन भुसावळच्या दिशेने मार्गस्थ झाली.
देशांतर्गत रेलसेवेला गतीमान करण्याच्या दृष्टीकोनातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत रेल सेवा सुरु केली आहे. अत्यंत जलद आणि लोकांना आधुनिक सुख सुविधा देणारी भारतीय बनावटीची वंदे भारत रेल्वे 10 ऑगस्ट पासुन नागपुर ते पुणे दरम्यान धावणार आहे. या वंदे भारत रेल्वेमुळे नागपुर-पुणे हे दोन महानगर दळणवळणासाठी जोडण्याचे काम केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
बुलढाणा लोकसभा मतदार संघातील शेगांवचे संत गजानन महाराज संस्थान संपुर्ण देशामध्ये प्रसिध्द आहे. देशभरातुन लाखो भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगांव नगरीमध्ये येत असतात. पुणे आणि नागपुर हे दोन्ही महानगर हवाई सेवेशी जोडलेले आहे. या महानगरातुन देश-विदेशातुन येणाऱ्या संत गजानन महाराजांच्या भक्तांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देणारी हि वंदे भारत रेल्वे ठरणारी आहे, असे मत केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी यावेळी व्यक्त केले. भाविकांच्या आणि मतदार संघातील नागरीकांच्या सुविधेसाठी केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी वंदे भारत ट्रेनला शेगांव येथे थांबा मिळवुन दिल्याने तिचा लाभ भक्तांसोबत जिल्हयातील नागरीकांनाही होणार आहे. वंदे भारत ट्रेनमुळे वेळेची बचत होणार आहे, त्या वंदे भारत ट्रेनचे स्वागत करण्यासाठी रेल्वे स्थानकावर अनेक जण आले होते, त्यांनी गजानन महाराज की जय, वंदे मातरम च्या घोषणा देत या ट्रेनचे स्वागत केले.