*सरकारने तातडीने पंचानामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्याची ग्रामस्थांची मागणी
चिखली : (एशिया मंच न्यूज )
तालुक्यातील मौजे पांढरदेव येथे शनिवारी सकाळी ११ ते १.३० दरम्यान मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाली. झालेल्या मुसळधार पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून गावकऱ्यांच्या घरात पाच ते सात फूट इतके पाणी साचले आहे. सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पांढरदेव ग्रामस्थांनी केली आहे.
खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी खर्च करून सोयाबीन , कापूस , तूर, उडीद, मुंग या पिकांची लागवड केली आहे. मात्र ऐन पेरणीनंतर दोन महिन्याचा कालावधी होत नाही तर पांढरदेव येथे ढगफुटी झाली. यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली असून शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यासोबतच घरांचे, रस्त्यांचे आणि जनावरांचीही प्रचंड हानी झाली आहे. यामुळे ग्रामस्थ आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. सरकारकडे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना योग्य व त्वरित भरपाई द्यावी, शेतकरी व गावकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस योजना राबवून पांढरदेवकरांचे अश्रू पुसावेत, अशी मागणी समस्त गावकऱ्यांनी केली आहे.