* शिवजयंतीचे उद्घाटन अभिनेते खा.अमोल कोल्हे यांच्या हस्ते
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास रुपेरी पडद्यावर जिवंत उभा करण्याचे काम डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. "स्वराज्य रक्षक संभाजी "च्या माध्यमातून घराघरात छत्रपती संभाजी महाराज व शिवराय पोहोचवण्याचे श्रेय खा.अमोल कोल्हे यांनाच दिले जाते. छत्रपती संभाजी राजांच्या पेहरावत त्यांना पाहण्याची जणू सवय दर्शकांना झाली आहे. रुपेरी पडद्यावरील हा "रांगडा कलावंत" बुलडाणेकराणा प्रत्यक्ष पाहता येणार असून 17 फेब्रुवारी रोजी ते शिवजयंती महोत्सवाचे उद्घाटन करणार आहे.
बुलडाणा शहरात साजरी होणारी शिवजयंती आगळीवेगळी विक्रम प्रस्थापित करणारी ठरत आहे. शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर शोन चिंचोले यांनी तर वाहून घेतल्यागत कामाला सुरुवात केली आहे. सर्व टीम त्यांना सहकार्य करीत असून हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना तितकंच उत्कट प्रतिसाद बुलडाणा कराचा मिळत आहे. शहरातील डॉक्टर्स ,व्यापारी, मुस्लिम धर्मीय आणि शिवप्रेमी असा हा "छत्रपतींचा मेळा" भरणार असून डॉक्टर खासदार अमोल कोल्हे यांच्या हस्ते 17 फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता उद्घाटन होत आहे.
विविध कार्यक्रम :
शिवकालीन शस्त्राचे प्रदर्शन, गड किल्ले चित्र प्रदर्शनी, व्याख्यान, पोवाडे, शिवज्योत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भव्य दिव्य शोभायात्रा असा "भरजरी थाट" यंदाच्या शिवजयंतीला लाभला आहे. वेगवेगळ्या समित्यांची निवड ही करण्यात आली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, खा.प्रतापराव जाधव, डॉ. राजेंद्र शिंगणे, आ. संजय गायकवाड, आ. धीरज लिंगाडे, जिल्हाधिकारी तूमोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड, जिल्हा परिषद मुकाअ भाग्यश्री विसपुते आदींसह राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती राहणार आहे. राज्यात शिवजयंतीचा आगळावेगळा प्रयोग बुलडाण्यातून सुरू झाला. हा लोकोत्सव अभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीने यंदा उंचीवर पोचणार आहे.