बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
महाराष्ट्र बांबु प्रमोशन फाउंडेशन व बुलडाणा अर्बन को-ऑप-क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त उपक्रमातून बुलडाणा जिल्हयात बांबु उद्योगाचे नवे पर्व प्रारंभ होत आहे.
महाराष्ट्र बांबु प्रमोशन फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.व्हि. गिरिराज भाप्रसे यांनी 7 सप्टेबर रोजी बुलडाणा अर्बनच्या मुख्यालयास भेट दिली. यावेळी बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेशामजी चांडक उपाख्य भाईजी यांनी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या भेटीमध्ये उभयंतामध्ये विदर्भ व मराठवाडयात बांबु उदयोगाचा विकास कसा करता येईल? यावर साधकबाधक चर्चा झाली. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना बांबु शेती करण्याबाबत प्रोत्साहित करने तसेच त्यासाठी कोणते रोपाची लागवड करावी यावर देखील चर्चा करण्यात आली. पाश्चात्य देशामध्ये प्लास्टीकला बांबु कसे पर्याय ठरत आहेत, यावर चित्रफित दाखविण्यात आली. बुलडाणा जिल्हयात बांबु पासून कोणत्या वस्तु तयार होतात याची देखिल माहिती देण्यात आली. बुरूड समाज व सुतार समाजाला सोबत घेवून बांबुपासून विविध वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण चंद्रपूर किंवा त्रिपुरा येथे देणेबाबतही चर्चा करण्यात आली. बुलडाणा अर्बन व महाराष्ट्र बांबू प्रमोशन फाउंडेशन बुलडाणा जिल्हयात बांबु लागवड करने व शेतकऱ्यांना यासाठी प्रवृत्त करणेसाठी संयुक्तपणे कार्य करणार असून लवकरचं बुलडाणा येथे या संदर्भात कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती ही बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेशाम चांडक यांनी दिली.