बिल्कीश बानो प्रकरणी स्त्री मुक्ती संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने * गुजरात सरकारने मानवतेला काळीमा फासला - प्रा.पठाण

बिल्कीश बानो प्रकरणी स्त्री मुक्ती संघटनेची जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने
* गुजरात सरकारने मानवतेला काळीमा फासला -     प्रा.पठाण
बुलढाणा : (एशिया मंच वृत्त)
        गुजरात दंगलीमध्ये बिल्कीश बानो या गरोदर महिलेवर बलात्कार करण्यात आला. कुटुंबातील सात लोकांची हत्या करण्यात आली. प्रकरणी न्यायालयाने आरोपींना जन्मठेप दिली असतांना गुजरात सरकारच्या आदेशाने आरोपी जेलमधून सोडले जाणे ही मानवतेला काळीमा फासणारी घटना आहे, असे प्रतिपादन प्रा.शाहिना पठाण यांनी केले. स्त्री मुक्ती संघटनेच्या वतीने आरोपींची जन्मठेप कायम ठेवावी या मागणीसाठी आज 8 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने केली गेली. यावेळी त्या बोलत होत्या. 
      प्रसंगी स्त्रीमुक्ती संघटनेच्या मिनलताई आंबेकर, प्रतिभाताई भुतेकर यांनीही सरकारवर टिकास्त्र सोडले.
स्त्री मुक्ती संघटनेच्या  कार्यकर्त्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे जमून गुजरात दंगलीतील आरोपींना मोकळे सोडण्याचा सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. न्याय द्या.. न्याय द्या.. बिल्कीश बानोला न्याय द्या.. अशा घोषणाबाजी करीत महिलांनी निदर्शने केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, गुजरात येथील रधीकपूर गावी बिल्कीश बानो या गरोदर महिलेवर अकरा लोकांनी गँगरेप केला. तिच्या ३ वर्षीय मुलीला डोक्यात दगड घालून ठार मारण्यात आले. तर परिवारातील सात सदस्यांची हत्या करण्यात आली. मुंबई सीजीआई कोर्टात या आरोपींना जन्मठेप सुनावण्यात आली. १४ वर्ष शिक्षा भोगल्यानंतर एकाएकी गुजरात सरकारने हे आरोपी सोडून दिले. सरकारच्या या कृतीने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे निवेदनात म्हटले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांना हे निवेदन देण्यात आले. 
        यावेळी मिनलताई आंबेकर, प्रा.शाहिना पठाण, डॉ.विजया काकडे, सौ.नवनिता चव्हाण, सौ.आशा इंगळे, श्रीमती रंजना वानखेडे, प्रतिभाताई भुतेकर, संघमित्रा कस्तूरे, ज्योत्स्ना जाधव, बानोबी चौधरी, सौ.वसुधा घुमरे, कल्पना पाटील. नम्रता पाटील. अनिता कापरे, शारदा वाघुळे, प्रमिला गवई, रेखा लांडे यांच्यासह इतर महिलांची उपस्थिती होती. 
      बिल्कीश बानोचा एकच धर्म आहे, तो म्हणजे स्त्री धर्म. त्यामुळे पुरुषी मानसिकता असणाऱ्यांना तिचे दुःख कसे कळणार? असा प्रश्न मिनलताई आंबेकर यांनी उपस्थित करुन आरोपींची जन्मठेप पुन्हा कायम करावी, अशी मागणी केली.