बुलडाणा जिल्हा रुग्णालयात पिण्याचे पाणी, MRI मशीन व स्वच्छतेचा गंभीर प्रश्न !* क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रशासनाला इशारा

बुलडाणा जिल्हा रुग्णालयात पिण्याचे पाणी, MRI मशीन व स्वच्छतेचा गंभीर प्रश्न !
* क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रशासनाला इशारा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेसाठी आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र असलेल्या बुलडाणा जिल्हा सरकारी रुग्णालयात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने या गंभीर परिस्थिती विरोधात जिल्हा शल्य चिकित्सकांना 14 ऑगस्ट रोजी निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
        दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, बुलडाणा जिल्हा रुग्णालयामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा अभाव, रुग्णालयात पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे लोकांना पाणी विकत घ्यावे लागतं किंवा अस्वच्छ पाणी पिण्याची वेळ येते. काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मशीन फक्त शोभेची वस्तू म्हणून उभ्या केल्या आहेत, त्याचा रुग्णांना काहीच फायदा होताना दिसत नाही. रुग्णालयाच्या आवारामध्ये कुठेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. ही परिस्थिती भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 (जीवनाचा व आरोग्याचा हक्क) व सार्वजनिक आरोग्य नियमावली यांचे उल्लंघन आहे. बराच काळ MRI मशीन कार्यरत नसल्याने रुग्णांना तात्काळ निदान मिळत नाही. परिणामी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे जावे लागते, ज्यामुळे आर्थिक बोजा वाढतो. रुग्णालयातील व परिसरातील अस्वच्छता ही संसर्गजन्य रोग प्रतिबंध अधिनियम, 1897 आणि राष्ट्रीय स्वच्छता मार्गदर्शक तत्वे यांचे उल्लंघन असल्याचे निवेदनात नमूद आहे.

           पुढील ७ दिवसांत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व पुरेशी सोय सुविधा करावी. त्याच बरोबर बंद असलेले MRI मशीन त्वरित दुरुस्त करून सुरु करावे. स्वच्छता व्यवस्थेसाठी कठोर आणि सातत्यपूर्ण उपाययोजना राबवाव्यात. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, जनतेच्या आरोग्याच्या हक्कावर कुणालाही गदा आणता येणार नाही, पुढील आठवड्यात समस्या सोडवली नाही तर रुग्णालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. 
        यावेळी क्रांतिकारी चे अमोल मोरे, महेंद्र जाधव, राहुल शेलार, शत्रुघ्न तुपकर, सुनील मिसाळ, शहनावाज आनवर, बबन बरडे, मोसीन खान, सागर भोंडे यांच्यासह आदी कार्यकर्ते  उपस्थित होते.