कोटपा कायद्यानुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी : गौरी सावंत
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
तरूणांमध्ये तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ सेवनाचे प्रमाण अत्याधिक वाढताना दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर लहान मुलांना विशेषत: ग्रामीण भगातील तरूणांना तंबाखुपासून परावृत्त करणे हे मोठे आव्हान आहे. तंबाखू सेवन हे मुख कर्करोग रोगाबरोबरच हृदयरोग, मधुमेह, अर्धांगवायू यासाठी कारणीभूत ठरते. त्यामुळे तंबाखुजन्य पदार्थ उत्पादन, विपणन, वाणिज्य, जाहीरात, व्यापार प्रतिबंध कायदा 2003 नुसार अर्थात कोटपा कायद्यानुसार तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या 100 मीटरच्या आत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरूद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशा सूचना प्र. निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांनी दिल्या आहेत.
तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन आज 2 फेब्रुवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड, पोलीस निरीक्षक श्री. वाघ, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. वसावे, तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा समन्वयक डॉ. लता बाहेकर आदी उपस्थित होत्या.
तंबाखूमुक्त शाळा, तंबाखूमुक्त आरोग्य संस्था व इतर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्याचे सूचीत करीत प्र. निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत म्हणाल्या, कोटपा कायद्यानुसार शैक्षणिक संस्था, शासकीय व निमशासकीय कार्यालयांच्या 100 मीटरच्या आवारात पानठेले, घाऊक व किरकोळ व्यापारी, तंबाखू विक्री करणारे व्यापारी अशा सर्वांवर आठवडाभरानंतर धडक कारवाई करावी. भविष्यातील तरूण पिढी आरोग्यसंपन्न रहावी, यासाठी कुणाच्याही व्यवसायावर गदा न आणता कायद्याच्या चौकटीत राहून पानठेले चालवण्यास काहीच अडचण नाही.
कायद्याच्या कलम 6 ब नुसार शैक्षणिक संस्था व शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या 100 मीटरच्या आत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करताना आढळल्यास सजग नागरिकांनी 9284132300 या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअैप करावे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार असून माहितीची शहानिशा करून योग्य ती कारवाई संबंधीतांवर करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरीय अंमलबजावणी पथकाच्या अधिकाऱ्यांसमवेत गैरवर्तणूक करणे, धमकीची भाषा वापरणे असे प्रकार करणाऱ्यांविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. याची नोंद घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
असा आहे कोटपा कायदा : कलम 4- सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी, दंड 200 रूपये. कलम 5 – तंबाखूजन्य पदार्थांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहीरातींवर बंदी, दंड पहिला गुन्हा असल्यास 2 वर्षापर्यंत शिक्षा किंवा 1000 रूपये दंड, दुसरा गुन्हा असल्यास 5 वर्षापर्यंत शिक्षा किंवा 5000 रूपये दंड. कलम 6 अ- 18 वर्षाखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी, कलम 6 ब- शैक्षणिक संस्था व शासकीय, निमशासकीय कार्यालयाच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी, दंड 200 रूपये असा आहे.
