पत्रकारांना सकारात्मक उर्जा प्रदान करतात सुविचार* बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचा अनोखा उपक्रम

पत्रकारांना सकारात्मक उर्जा प्रदान करतात सुविचार
* बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाचा अनोखा उपक्रम
 बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
      वर्तमानपत्रात निरंतर कार्य करणाऱ्या पत्रकारांचा प्रत्येक दिवस विविध आव्हानांना सोबत घेवूनचं उगवत असतो. आपल्या कौटुंबिक व व्यक्तीगत आयुष्यातील अनेक समस्यांचा सामना करीत असताना त्याचवेळी वाचकांना दररोज काहीतरी नवे देण्याचा प्रयत्न पत्रकारांकडून होत असतो. अहोरात्र वाचकांच्या हितासाठी झटणाऱ्या पत्रकारांमध्ये नकारात्मकता येवू नये, कोणत्याही संकटाशी सामना करण्यासाठी त्यांचे मनोबल कायम रहावे, या हेतूने बुलडाणा जिल्हा पत्रकार संघाने जिल्हा पत्रकार भवन परिसरात सुविचार लेखनाचा अनोखा उपक्रम कार्यान्वित केला आहे. या उपक्रमासाठी इलेक्ट्रानिक मिडियाचे प्रतिनिधी व विख्यात निवेदनकर्ता संदिप वानखेडे यांच्यासह जिल्हा पत्रकार संघाचे नवनियुक्त पत्रकारांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.
       बुलडाणा जिल्हयाची पत्रकारिता सकारात्मक पत्रकारितेसाठी राज्यभर ओळखली जाते. शहरातील विविध दैनिकांमध्ये पत्रकारिता करणाऱ्या सर्व पत्रकारांचे वाढदिवस जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणीकडून साजरा करण्याचा पायंडा बुलडाण्यातचं दिसून येतो. सुविचार लेखनाच्या या उपक्रमामुळे पत्रकारांना रोजच्या जीवनात सकारात्मक उर्जा प्राप्त होवून नव्या आव्हानांना पेलण्याचं सामर्थ्य मिळणार आहे. पत्रकार भवनाच्या प्रवेशव्दारावर लावलेल्या फलकावर विविध थोर पुरूष व विचारवंतांचे विचार सुविचाराच्या माध्यमातून अंकित केले जातात. जिल्हा पत्रकार संघाचे नव निर्वाचित अध्यक्ष चंद्रकांत बर्दे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम चालविला जात आहे.  या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.