* दिग्दर्शक अविनाश कोलते यांची पत्रकार परिषदेत माहिती
* 4 फेब्रुवारीला फास महाराष्ट्रभर झळकणार
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
महाराष्ट्रातील शेतकरी केवळ दिड-दोन लाखाच्या कर्जाने हतबल होवून आत्महत्ये सारखं पाउल उचलतात. वास्तविक पाहता कर्ज कोणावर नसतं? सरकारी कर्मचारी असो की, बिजनेस मॅन या सर्वांवर लाखोंचे कर्ज असते, मात्र ते कधी आत्महत्येसारखी टोकाची पावलं उचलतांना दिसत नाहीत. मग, शेतकरीचं फासावर का लटकतात? त्यांची मनोवस्थेच्या मागे काय असावी? देशाच्या पोषणकर्तावरचं अशी विपन्न अवस्था का यावी? यासह इतर अनेक मुददयांचा शोध घेवून, त्यावर भाष्य करण्याचा एक छोटासा प्रयत्न फास या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. 4 फेब्रुवारी 2022 रोजी हा चित्रपट महाराष्ट्रभर प्रदशिर्त होत असून, प्रत्येकाने आवर्जुन हा चित्रपट बघावा, असे आवाहन फास चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश कोलते यांनी पत्रकार परिषदेत केले.
स्थानिक जिल्हा पत्रकार भवनाच्या सभागृहात शनिवार 29 जानेवारी 2022 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, निर्माती माहेश्वरी पाटील चाकुरकर, अभिनेता कमलेश सावंत, अभिनेत्री सृष्टी लोढे, पुजा तायडे आदी उपस्थित होते. यावेळी रविकांत तुपकर यांनी ही हा चित्रपट आवर्जुन बघण्याचे आवाहन केले. निर्माती माहेश्वरी चाकुरकर यांनी फास चित्रपटाच्या निर्मिती मागील हेतू कथन केला. तर अभिनेता कमलेश सावंत यांनी चित्रपटात साकारलेल्या बळीराम या व्यक्तीरेखेबददल सांगितले. या चित्रपटात मराठी चित्रपट जोगवा फेम उपेंद्र लिमये यांनी ही भूमिका साकारली असल्याची माहिती यावेळी दिग्दर्शक अविनाश कोलते यांनी दिली.
