तांदुळवाडी गावठाणात ग्रामस्थांना प्लॉट उपलब्ध करुन द्या* जयश्रीताई शेळके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

तांदुळवाडी गावठाणात ग्रामस्थांना प्लॉट उपलब्ध करुन द्या
* जयश्रीताई शेळके यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     तालुक्यातील तांदुळवाडी येथील नवीन गावठानच्या विस्तारीकरणासाठी जमीन अधिग्रहित करुन तब्बल २८ वर्षे उलटली. मात्र अद्यापही याठिकाणी नवीन गावठानचा विस्तार करण्यात आलेला नाही. तातडीने जमिनीचा सातबारा शासनाच्या नावाने करुन ग्रामस्थांना गावठाण्यात प्लॉट उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या सचिव ॲड. जयश्रीताई शेळके यांनी ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली.
       तांदुळवाडी येथील नविन गावठाणाच्या विस्तारासाठी श्रीमती यमुनाबाई गंजीधर रिंढे यांच्याकडून सन १९९१- ९२ मध्ये शासनामार्फत त्यांच्या मालकीची गट क्र. २३५ मधील ०.८९ आर जमिन अधिग्रहित करण्यात आली होती. या व्यवहारासंबंधी १९९४ मध्ये फेरफार करण्यात आला आहे. मालकाला जमिनीचा पुर्ण मोबदला देण्यात आला आहे. तरीही अद्यापपर्यंत जमिनीच्या सातबाऱ्यावर मूळ मालकाच्याच नावाची नोंद आहे. शासनाकडून या जमिनीवर एकुण ४९ प्लॉट पाडण्यात आले होते. त्यापैकी १४ प्लॉट शासन नियमानुसार रक्कम भरुन गावकऱ्यांनी विकत घेतले आहेत. तसेच ८ प्लॉटची शासन नियमानुसार ठरलेली १/४ रक्कम काही नागरिकांनी भरलेली आहे. तर एकुण प्लॉटपैकी ४ प्लॉट हे मोकळ्या मैदानासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. गावातील काही नागरिकांना शासनाकडून घरकुल मंजूर झाले आहेत. परंतु प्लॉटची वाटप झालेली नसल्यामुळे घरकुल मंजूर झालेल्या नागरिकांना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच सद्यस्थितीत यातील काही प्लॉटवर गावातील नागरिकांकडून अतिक्रमण करण्यात आलेले आहे. निवेदन देतेवेळी गणेशराव रिंढे, हरिभाऊ रिंढे, भगवान रिंढे, किशोर वाघ, रामधन डुकरे, निलेश रिंढ, गोपाल रिंढे, राहुल रिंढे, तुषार रिंढे, महेश रिंढे, समाधान रिंढे, गणेश रिंढे, कौतिकराव राऊत, परसराम रिंढे, अनिल रिंढे, विलास रिंढे, सागर रिंढे, गंगाराम पवार आदी गावातील नागरिक उपस्थित होते.

 अधिग्रहित जमिन मूळ मालकाकडे जाण्याची भीती
     नविन गावठाणाच्या विस्तारासाठी शासनाच्यावतीने ही जमिन अधिग्रहित करण्यात आली होती. परंतु याठिकाणी अद्यापपर्यंत नविन गावठाणचा विस्तार केलेला नाही. त्यामुळे सदर जमिनीच्या मुळ मालकाकडून ही जमिन परत मागितली जात आहे. शासनाने वेळीच निर्णय घेतला नाही तर दुर्देवाने अधिग्रहित केलेली जमिन मुळ मालकाला परत द्यावी लागेल. त्यामुळे नविन गावठाणचा विस्तार करण्यासाठी जमिनीचा सातबारा शासनाने तातडीने आपल्या नावे करुन त्या जमिनीवरील प्लॉट गावातील नागरिकांसाठी उपलब्ध करुन द्यावेत, अशी मागणी जयश्रीताई शेळके यांनी केली आहे.