बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
तालुक्यातील देऊळघाट परिसरात मोठ्या प्रमाणात फर्निचरच्या दुकाना सुरू असून काही दुकान मालक अवैध सागवनचा वापर करून फर्निचर तयार करून विकतात. ही बाब लक्षात येताच बुलडाणा वन विभागाच्या पथकाने एका फर्निचर दुकानावर धाड टाकून तेथून अंदाजे 80 हजाराचा कट साईज सागवन लाकूड जप्त केला आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील फर्निचर व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहे.
सागवन लाकुडची अधिकृत परवानगी घेऊन त्याची कटिंग व वाहतूक करता येते परंतु नियमाला ठेंगा दाखवून काही लोक मनमानी करतात. नव्याने बुलडाणा उपवन संरक्षक म्हणून रुजू झालेले जमीर शेख यांना गुप्त माहिती मिळाली की, देऊळघाट परिसरात अवैध सागवान पासून फर्निचर तयार करून विकला जात आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी काल 9 मे रोजी बुलडाणा आरएफओ सुनील वाकोडे यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले असता त्यांनी तात्काळ सायंकाळी पथक रवाना केले. बुलडाणा ते देऊळघाट मार्गावरील बिरसिंगपूर फाट्या जवळ विठ्ठल फर्निचरवर धाड टाकून तपासणी केली असता त्या ठिकाणी 18 नग कट साईज अवैध सागवन मिळून आला असून सदर लाकूड वनविभागाने जप्त केले आहे. या प्रकरणी फर्निचर दुकान चालक विठ्ठल शेजोळ रा.देऊळघाट याच्या विरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई मुख्य वन संरक्षक अमरावती श्रीमती जयोती बॅनर्जी, उप वनसंरक्षक बुलडाणा जमीर शेख, वनपरिक्षेत्र अधिकारी बुलडाणा सुनील वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बुलडाणा प्रदीप प्रकाश मुंढे, वनरक्षक गजानन शिंदे, समाधान झोटे, नितेश गवई, वनमजूर दीपक सोनुने, रवींद्र तायडे, पवन मुळे, प्रवीण सोनुने तसेच वाहन चालक संदीप मडावी यांनी पार पाडली. पुढील तपास वनपाल बुलडाणा प्रदीप मुंढे करीत आहे.
