* बुलडाणा जिल्हा कंत्राटदार संघटनेने केले धरणे आंदोलन
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
येथील जिल्हा कंत्राटदार संघटनेच्यावतीने प्रलंबित देयके तात्काळ अदा करण्यात यावी, अन्यथा काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल अशी मागणी संघटनेच्या वतीने देण्यात आली. हे आंदोलन शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया समोर करण्यात आले.
मागील दोन वर्षात जिल्ह्यातील अनेक कंत्राटदारांनी कोट्यावधीची कामे केलेली आहेत. त्याची देयके अद्याप ही देण्यात आलेली नाही त्यामुळे कंत्राटदारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली आहे. यामुळे बांधकाम साहित्य, पुरवठादार, मजुर कंत्राटदार, कंत्राटदारांची कार्यालय कर्मचारी, सुपरवायझर, इंजिनीयर तसेच बँकांमधून व्यवसायासाठी घेतलेले कर्जाचे हप्ते फार मोठ्या प्रमाणात थकीत झाले आहे. यामुळे कंत्राटदार प्रचंड मानसिक तणावात आले आहेत. हे देयके न मिळाल्याने कंत्राटदारांचे नियोजन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी कंत्राटदारांची देयके देण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास कंत्राटदार संघटनेच्यावतीने काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आली आहे. सदरचे निवेदन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले.
या निवेदनावर बुलढाणा जिल्हा कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष अर्जुन काटे, उद्धव नागरे, संतोष पाटील, राजेश पिंपळे , रवी राजपूत, यु.एम.पानसे, अविनाश वाघ, आर. सरोदे, नीरज कुमार ठोसर, तुळशीराम मांनघाले, दीपक सिंग राजपूत, अविनाश गायकवाड, जे.एन. जैन, एस आर सोळंके, ए.वी. बाहेकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
