दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या महिलेचे अखेर प्रेतचं सापडले

दोन महिन्यापासून बेपत्ता असलेल्या महिलेचे अखेर प्रेतचं सापडले
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     दोन महिन्यांपूर्वी बुलडाणा तालुक्यातील भादोला येथून अचानक बेपत्ता झालेल्या एका ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आज मंगळवार १९ ऑक्टोबर रोजी दुपारी बाराच्‍या सुमारास बुलडाणा- खामगाव रोडवरील माळविहीर शिवारातील पोखरी फाट्याजवळील विहिरीत आढळला. महिलेचे पतीने व मुलीने कपड्यांवरून मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह सुंदरखेड येथील सौ. मनिषा मुरलीधर इंगळे (५५) या महिलेचा असल्याचे समोर आले आहे. त्या २६ ऑगस्ट रोजी भादोला येथून बेपत्ता झाल्या होत्या.         बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मनिषा इंगळे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोखरी फाट्याजवळ शेतात सोयाबीन सोंगणाऱ्या मजुरांना दुर्गंधी येत होती. त्यामुळे मजुरांनी पाहणी केली असता काठोकाठ तुडूंब भरलेल्या विहिरीत कुजलेला मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यासंबंधीची वार्ता पसरताच नागरिकांनी गर्दी केली. केवळ हाडांचा सांगाडा असलेल्या या मृतदेहाची ओळख पटविणे कठीण होते. मात्र अंगावरील कपड्यांवरून महिलेच्या पतीने आणि मुलीने ओळख पटविली. मृतदेह कुजलेला असल्याने घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.