* १२९ नागरिकांना विविध दाखल्यांचे व लाभांचे वाटप
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
नगरपरिषद बुलढाणा हद्दीतील नागरिकांच्या समस्यांचे जागेवरच निराकरण करण्यासाठी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आज ८ मे २०२६ रोजी 'महाराजस्व समाधान शिबिरा'चे आयोजन करण्यात आले होते. महसूल व नगर विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक वारकरी भवन येथे सकाळी ११ वाजता हे शिबीर पार पडले.
मान्यवरांची उपस्थिती या शिबिराचे अध्यक्षस्थान आमदार संजय गायकवाड यांनी भूषविले. कार्यक्रमाला बुलढाणा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पुजा गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच नगरपरिषदेचे गटनेते, उपाध्यक्ष, सर्व विषय समिती सभापती, नगरसेवक आणि नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत उत्साहात राज्यगीताने करण्यात आली. उपविभागीय अधिकारी शरद पाटील यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट करत प्रास्ताविक सादर केले. अध्यक्षीय भाषणात आमदार संजय गायकवाड यांनी "शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे," असे ठाम मत व्यक्त केले. 1 जानेवारी 2011 पूर्वीची शासकीय जमिनीवरील रहिवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यासंदर्भात त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना महत्त्वपूर्ण तांत्रिक मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये प्रशासकीय तत्परतेचा प्रत्यय नागरिकांना आला. एकूण १२९ नागरिकांना विविध सेवांचा लाभ प्रत्यक्ष देण्यात आला. बुलढाणा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थ्यांचे आभार मानले. शिबिराची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
या 'महाराजस्व समाधान शिबिरा'मुळे शासकीय कामांसाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रशासकीय कामात पारदर्शकता आणि वेग आल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
