* बुलडाणा न्यायालयाचा निकाल
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
चिखली तालुक्यातील अमडापुर येथील बबलू महापूरे यांच्या 31 मार्च 2016 रोजी कॉटन मार्केट च्या जागेत गळ्यात फास घालून बबलू महापूरे यांच्या खून प्रकरणी आज तब्बल 5 वर्षानंतर घटनेतील दोन्ही आरोपी राहुल देविदास महापुरे व विठ्ठल रामकृष्ण धनवटे यांना विद्यमान प्रमुख जिल्हा न्यायाधीश एस.सी.खटी यांनी जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की चिखली तालुक्यातील अमडापुर येथील राहुल महापुरे व विठ्ठल धनवटे रा. ईसोली यांनी दिनांक 31 मार्च 2016 रोजी सकाळी एक ते दीड वाजेच्या दरम्यान अमडापुर येथील कॉटन मार्केट च्या जागेत लिंबाच्या झाडाच्या फांदीला दोर बांधून एका टोकाला फास केला व मृतक बबलू उर्फ विनोद महापुरे याला तवेरा चारचाकी गाडीच्या टपावर उचलून गळ्यात फास घातला व राहुल महापुरे याने गाडी सुरू करून हळूहळू पुढे चालविली त्यामुळे बबलूच्या गळ्याला फास आवळल्या गेला व तो लटकून मरण पावला. राहुल महापुरे व विठ्ठल धनवटे यांचा खून केला परंतु बबलू ने फाशी घेतल्याचे दर्शविले होते. यावरून 14/2016 कलम 174 जाफौ. नुसार मर्ग दाखल करण्यात आला होता दरम्यान गुन्हा घडल्या नंतर तीन महिन्याने पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर जायभाये पोलिस स्टेशन अमडापुर यांनी 9 जुन 2016 रोजी गुन्ह्याची पार्श्वभूमी तपासल्यानंतर पोलिस स्टेशन अमडापुर येथे आरोपी राहुल महापुरे व विठ्ठल धनवटे यांच्या विरुद्ध फिर्याद दिली. सदरचा आरोपी व मृतक बबलू महापुरे यांचे प्लॉट विक्रीच्या व्यवहार वरून वाद होते म्हणून आरोप राहुल महापुरे याने विठ्ठल धनवटे यांच्या मदतीने मृतक बबलू उर्फ विनोद महापुरे याला फाशी दिली.व तीन महिने सदरची बाब लपवुन ठेवली होती.राहुल महापुरे यांच्या विरुद्ध या अगोदर सुद्धा अमडापुर येथील व्यक्तीच्या खून व आणखी ही गुन्ह्याची नोंद तो गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्याने त्याचा अमडापुर शिवारात दबदबा निर्माण झाला होता. पोलिसांनी तपासा दरम्यान आरोपींना अटक करून महत्वाचे साक्ष पुरावे व त्याचे जवाब घेतल्या नंतर दोषारोप पत्र कलम 302,34 नुसार गुन्हा दाखल केला व विद्यमान सेशन कोर्ट बुलडाणा येथे प्रकरण सुरू झाले. दरम्यान सदरचे सेशन केस नंबर 83/16 एस.पी.हिवाळे सहाय्यक सरकारी वकील बुलडाणा यांच्याकडे सेशन चालविण्यासाठी वर्ग करण्यात आले. सदरच्या प्रकरणात सरकारी पक्षाने 23 साक्षीदार यांची साक्ष नोंदविल्या नंतर योग्य व सबळ पुरावे न्यायालयात दाखल केला व योग्य पुराव्याच्या आधारे प्रभावी व काळजीपूर्वक युक्तिवाद नंतर विद्यमान जिल्हा न्यायाधीश एस.सी.खटी यांनी दोन्ही आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली व प्रत्येकी 10 हजार रु दंड ठोठावला आहे.
