* विभागातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची बढती, पदोन्नतीवर चर्चा
* अनुसूचित जाती कल्याण योजनांचाही आढावा
* पुरग्रस्त मदत, नुकसानीची घेतली माहिती
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
महाराष्ट्र विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती आजपासून 6 ऑक्टोंबरपर्यंत जिल्हा दौऱ्यावर आहे. समितीने दौऱ्याच्या पहिल्या दिवशी 4 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला. यावेळी व्यासपीठावर विधानसभा सदस्य तथा समितीप्रमुख कु. प्रणितीताई शिंदे, विधानसभा सदस्य तथा समिती सदस्य सर्वश्री यशवंत माने, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, अरूण लाड, राजेश राठोड आदी उपस्थित होते. तसेच विधानमंडळ सचिवालयातील अवर सचिव प्र. श्री. खोंदले, जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, कक्ष अधिकारी विनोद राठोड, सहा. कक्ष अधिकारी दत्तात्रय बेंगलवार आदीही उपस्थित होते.
समितीने सर्वप्रथम जिल्ह्यात गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. समितीला जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांनी जिल्ह्यातील पीक नुकसानीची माहिती दिली. समितीने नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीची देता येणारी 5 हजार रूपयांची आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या. निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी पडझड झालेल्या घरांची, मृत पावलेल्या व्यक्ती व दिलेल्या नुकसान भरपाईची माहिती दिली. त्यानंतर सहाय्यक आयुक्त श्रीमती राठोड यांनी प्रास्ताविक केले. समितीने जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची बढती, पदोन्नती, अनुशेष, रिक्त पदे, बिंदुनामावली आदींचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुचना दिल्या. त्यानंतर जिल्ह्यातील मलकापूर, मेहकर, लोणार, दे.राजा, सिं.राजा, बुलडाणा, खामगांव, शेगांव, जळगांव जामोद, चिखली व नांदुरा नगर पालिकांमधील व मोताळा, संग्रामपूर नगर पंचायत मधील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचा भरती, अनुशेष, पदोन्नतीचा आढावा घेतला. तसेच नगर पालिका व नगर पंचायत मध्ये दलित वस्ती विकास योजना, अनुसूचित जाती प्रवर्गाच्या कल्याणासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा घेतला. बैठकीला सर्व विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद, समाज कल्याण विभागाचा आढावा
महाराष्ट्र विधान मंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने जिल्हा परिषदेच्या श्री. छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हा परिषदेकडील यंत्रणा व समाज कल्याण विभागाचा आढावा घेतला. समितीने जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण, कृषि, पशुसंवर्धन, आरोग्य, महिला व बालकल्याण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, शिक्षण, पंचायत विभागातील अनुसूचीत जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची बढती, पदोन्नती, आरक्षण, बिंदुनामावली, पदभरती बाबत आढावा घेतला. तसेच सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कडील दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजना, शिष्यवृत्ती, वसतिगृह आदींविषयी चर्चा केली. जिल्हा परिषदेकडील समाज कल्याण विभागातंर्गत राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह योजना, वसतिगृह, महात्मा ज्योतिबा फुले शिष्यवृत्ती योजना, जि.प. सेस फंडमधील मागासवर्गीयांच्या कल्याणकारी योजनांचा आढावाही घेतला. पशुसंवर्धन विभागाकडील दुधाळ जनावरे वाटप, शिक्षण विभागाकडील शालेय पोषण आहार, महिला व बाल कल्याणकडील स्तनदा व गरोदर माता, बालकांना पौष्टीक आहार वाटप आदींचा आढावा घेतला. यावेळी जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, सहायक आयुक्त श्रीमती अनिता राठोड आदी उपस्थित होते.
