* ॲड.जयश्रीताई शेळके यांची गृहमंत्र्यांकडे मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
गरिमा रिअल इस्टेट अँड अलाईड लिमिटेड कंपनी व या कंपनीशी संबंधित इतर संलग्न कंपन्यांवरील राज्यभरातील दाखल गुन्ह्यांमध्ये तात्काळ दोषारोपपत्र दाखल करुन राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव ॲड.जयश्रीताई शेळके यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली.
महाराष्ट्रात आर्थिक व्यवहार करण्याच्या दृष्टीने गरिमा रियल इस्टेट ॲण्ड अलाईड लिमिटेड व गरिमा होम्स ॲण्ड फार्मा हाऊसेस लिमिटेड आणि साथी मल्टीस्टेट सोसायटी ही प्रतिष्ठाने सुरु करण्यात आली. कंपनीने नेमलेल्या प्रतिनिधींमार्फत आर.डी. बचत खाते, मुदत ठेव खाते, मासिक, वार्षिक, सहामाही अशा विविध योजना चालविण्यात आल्या. प्रत्येक योजनेमध्ये प्रतिनिधींच्या माध्यमातून राज्यभर अनेक लोकांनी आर्थिक गुंतवणूक केली. सुरुवातीची काही वर्ष गुंतवणूकदारांची नियमित परतफेड करण्यात आली. परंतु सन 2014-15 पासून कंपनीकडून गुंतवणूकदारांना परतावा येणे बंद झाले.
ग्वाल्हेर, मध्य प्रदेश येथील मा. जिल्हा सत्र न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कंपनीचे चेअरमन बी.एल.कुशवाह भरतपूर कारागृहात जेरबंद आहेत. तसेच त्यांच्या सर्व मालमत्तेवर मा. न्यायालयाने जप्ती आणली आहे. उर्वरित कंपनीचे संचालक मंडळ फरार आहे. सर्व संचालक मंडळावर बुलडाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये दि.५/२/२०१८ रोजी गुन्हा क्र.७०/२०१८ नोंदविला आहे. परंतु अद्यापपर्यंत कोणतेही दोषारोप पत्र दाखल करण्यात आलेले नाही. याच पद्धतीने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. परंतु अनेक ठिकाणी अद्यापही दोषारोपपत्र दाखल केलेले नाही. कंपनीच्या प्रतिनिधींवर गुंतवणूकदारांकडून पैसे परत मिळावेत यासाठी मोठ्या प्रमाणात दबाव आणला जातो. केवळ बुलडाणा जिल्ह्यातीलच नाही तर राज्यभरातून अनेक जिल्ह्यांमधून हजारो लोकांनी आपल्या कष्टाचे घामाचे पैसे वाढवून दुप्पट-तिप्पट मिळतील या आशेने संबंधित कंपनीमध्ये गुंतविलेले होते.आज रोजी गुंतविलेली रक्कमही बुडाल्यामुळे हे सर्वच प्रतिनिधी तसेच गुंतवणूकदार खुप मोठ्या आर्थिक व मानसिक त्रासाचा सामना करित आहेत.
उच्च न्यायालय ग्वाल्हेर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने जप्ती केलेल्या मालमत्तेच्या विक्रीसाठी मागणी करण्यात यावी. विक्रीची रक्कम महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना देण्यात यावी, जेणेकरून त्यांना दिलासा मिळेल. राज्यभरात ज्या ज्या ठिकाणी गुन्हे दाखल असतील त्या ठिकाणी तपास लवकरात लवकर पूर्ण करुन या गुन्ह्यातील सर्व आरोपींचे आरोपपत्र मा.न्यायालयात दाखल करण्यात यावे. तसेच या सर्वांना या माध्यमातून फसवणूक झालेल्या राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी ऋषिकेश म्हस्के, कंपनी प्रतिनिधी दिनेश दयाराम जाधव, अण्णासाहेब घिगे, आत्माराम आश्रुजी चांदोरे, श्रीराम तानाजी नवले, दिलीप अर्जुन मोरे, अशोक मोतीराम शेळके, अर्जुन दत्तु पवार, आदिनाथ पवार, जगदीश गणेशराव नेवडे, बाळासाहेब नांदे उपस्थित होते. बुलडाणा जिल्ह्यात दीड हजार प्रतिनिधी
एकट्या बुलडाणा जिल्ह्यामध्ये जवळपास १५०० प्रतिनिधी कंपनीमार्फत नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्याखालोखाल येणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या खूप मोठी आहे. ही आकडेवारी पाहिल्यास राज्यभरातून हजारो प्रतिनिधीमार्फत गुंतवणूक केलेल्या नागरिकांची संख्या ही हजारोंच्या घरात आहे. नागरिकांनी केलेल्या आर्थिक गुंतवणूकीचा कोणताही परतावा अद्यापपर्यंत कंपनीकडून मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या समोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
