त्या रेमडेसिविर सॅम्पलचा अहवाल अप्रमाणित* दोषींवर कारवाई होणार


त्या रेमडेसिविर सॅम्पलचा अहवाल अप्रमाणित
* दोषींवर कारवाई होणार
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
कोरोना काळामध्ये मे महिन्यात शहरातील दोन हॉस्पिटलच्या तीन कर्मचाऱ्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी 16 इंजेक्शन जप्त केले होते. त्यांची सॅम्पल मुंबईच्या प्रयोगशाळेत मे महिन्यात पाठविण्यात आले होते. 11 ऑक्टोंबरला या सॅम्पलचा रिपोर्ट प्राप्त झाला असून तो अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे संबंधितांवर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
     कोरोना काळातील ती भयानक परिस्थिती सर्वांनीच अनुभवली. काही डॉक्टरांनी त्यावेळी शहरासह जिल्ह्यातील 7 हॉस्पिटलने कोविड रुग्णाची तब्बल 5 लाख रुपयांनी लूट केली तर बुलडाणा शहरातील डॉक्टर लध्दड, डॉक्टर मेहेत्रे हॉस्पिटल च्या 3 कर्मचाऱ्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केला. रेमडेसिविरमध्ये सलाईनची पाणी भरून विकणारे तीन आरोपी अटक झाल्यानंतर जामिनावर सुटले.  जिल्ह्यातील डॉक्टर लध्दड, डॉक्टर मेहेत्रे हॉस्पिटलसह खरात हॉस्पिटल, आशीर्वाद हॉस्पिटल, ऑक्सिजन कोविड सेंटर, मातोश्री हॉस्पिटलने लाखो रुपयांची लूट केल्याचे लेखापरीक्षणतून तत्पूर्वी स्पष्ट झाले आहे.  याप्रकरणी जीवाशी खेळ करणाऱ्या राम गडाख, लक्ष्मण तरमळे, संजय इंगळे  या तिन्ही आरोपींची तीनदा पीसीआर मिळाल्यानंतर सुटका झाली. संबंधित  डॉक्टर दोषी आहे की नाही याचा तपास सुरू आहे. शहर पोलिसांचा व एफडीएच्या असिस्टंट कमिशनर अशोक बर्डे यांचा तपास सुरू असताना 11 ऑक्टोबर 2021 रोजी  या प्रकरणात जप्त केलेले रेमडीसिविर अप्रमाणित असल्याचा अहवाल एफडीएला प्राप्त झाला आहे. रेमडेसिविर काळाबाजार प्रकरणी दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी जिल्हावासी यांच्या कडून होत आहे.