* पाणी आरक्षण समिती सभा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
जिल्ह्यामध्ये सिंचन व बिगर सिंचनाकरीता पाण्याची मागणी असते. याबाबत विविध पाणी वापर यंत्रणा कार्यरत आहेत. पाणी वापराची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तरी पाणी वापर करणाऱ्या यंत्रणांनी आपल्याकडील थकबाकी तातडीने भरावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात पाणी आरक्षण समितीची सभा आज 25 ऑक्टोंबर रोजी आयोजित करण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, बुलडाणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एस. सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी प्रविण कथने आदी उपस्थित होते.
खकडपूर्णा नदीच्या काठावरील 44 गावांकरीता नदीपात्रात पाण्याच्या मागणीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, खकडपूर्णा नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संयुक्तरित्या कायमस्वरूपी पाणी आरक्षणाचा प्रस्ताव तयार करून शासनाला पाठवावा. तसेच मोताळा तालुक्यातील व्याघ्र नाला प्रकल्पात केवळ 35 टक्के पाणीसाठा असल्यामुळे या प्रकल्पातील संपूर्ण पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षणानुसार राखून ठेवावा. बिगर सिंचन थकबाकी बाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, खामगांव यांच्याकडील थकबाकी प्रामुख्याने वसूल करावी. बैठकीचे सादरीकरण, संचलन व आभार प्रदर्शन सहा. अभियंता योगेश तरंगे यांनी केले. जिल्ह्यात बिगर सिंचनाची एकूण थकबाकी 253.04 लक्ष आहे. सभेला उपकार्यकारी अभियंता क्षितीजा गायकवाड, कनिष्ठ अभियंता विजयसिंह राजपूत, व्ही. पी वैराळकर आदींसह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
असे आहे पिण्याचे पाणी आरक्षण
मोठे प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा 222.69 दलघमी असून बाष्पीभवन वगळून उपलब्ध होणारे पाणीसाठा 155.88 दलघमी आहे. यामध्ये पिण्यासाठी 11.98 दलघमी राखून ठेवण्यात आला आहे. मध्यम प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा 136.11 दलघमी आहे. यामधील बाषीभवन वगळून उपलब्ध होणारा पाणीसाठा 95.27 दलघमी असून पिण्याचे पाण्याचे आरक्षण 8.36 दलघमी आहे. लघू प्रकल्पात 156.82 दलघमी उपलब्ध पाणीसाठा आहे. यामध्ये 109.77 दलघमीचे बाषीभवन वगळून 3.76 दलघमी पिण्यासाठी आरक्षीत आहे. अशाप्रकारे एकूण 515.62 दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामधील 360.92 दलघमी पाणीसाठ्याचे बाषीभवन गृहीत धरण्यात आले आहे. तर 24.11 दलघमी पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षीत आहे.
