सायकल रॅली काढून जिल्हा परिषदेने दिला पर्यावरण व स्वच्छतेचा संदेश

सायकल रॅली काढून जिल्हा परिषदेने दिला पर्यावरण व स्वच्छतेचा संदेश
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
       जिल्ह्यात पर्यावरण संतुलन प्लास्टिक बंदी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण ची व्यापक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद अंतर्गत आज 25 ऑक्टोंबर रोजी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषाताई पवार व जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कमलताई बुधवत यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, अर्थ व बांधकाम सभापती रियाजखान पठाण, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई पडघान, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. सांगळे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय चोपडे, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंदनसिंग राजपूत, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. राठोड, शिक्षणाधिकारी श्री. मुकुंद व श्री. जगताप यांची उपस्थिती होती.
      प्रास्ताविक पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंदन सिंग राजपूत यांनी केले. यावेळी त्यांनी सायकल रॅली बाबत पार्श्वभूमी विषद करताना सांगितले पर्यावरण, प्लास्टिक बंदी व स्वच्छतेची मोठ्या प्रमाणात कृती होणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदने सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी त्या म्हणाल्या, निसर्गाचा पर्यावरणाचा समतोल बिघडल्याने आज अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच गावागावात प्रत्येक नागरिकांने शौचालयाचा नियमित वापर करून आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने आपले योगदान दिले पाहिजे. जिल्हा ओडीएफ प्लस करण्यासाठी प्रत्येक गावाने स्वच्छतेच्या या चळवळीत आपला सहभाग नोंदवावा.
      जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषाताई पवार अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या, पर्यावरणाचे संतुलन राखणे ही आज काळाची गरज बनली आहे. एकदा वापरात येणारे प्लास्टिकचा वापर प्रत्येकाने टाळून आपल्या घरातून प्लास्टिकला हद्दपार करणे गरजेचे आहे. गावाने स्वच्छते विषयक संकल्प करून आपले गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नियमितपणे शौचालयाचा वापर करणे, गावात घनकचरा व सांडपाणीचे योग्य व्यवस्थापन करणे यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतल्यास आपण गावाचा चेहरामोहरा बदलू शकतो. यासाठी प्रत्येकाने पर्यावरण व स्वच्छतेच्या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवला पाहिजे.
        या रॅलीमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी, प्रबोधन विद्यालय, भारत विद्यालय, जिजामाता महाविद्यालय, नेहरू युवा केंद्र, पर्यावरण ग्रुप बुलडाणा प्राध्यापक, शिक्षक यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रॅलीची सुरुवात जिल्हा परिषद येथून 12 वाजता होऊन संगम चौक, राठोड भवन, शासकीय विश्रामगृह, चिंचोले हॉस्पिटल, सर्क्युलर रोड, त्रिषरण चौक, कारंजा चौक, आनंद ज्वेलर्स, बाजार गल्ली, जयस्तंभ चौक या मार्गे जिल्हा परिषदेत रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली दरम्यान स्वच्छ भारत मिशन ग्रामीण चा स्वच्छता रथाद्वरे ध्वनिक्षेपकद्वारे विविध घोषणा देण्यात आल्या. प्रत्येक नागरिकाने पर्यावरण व स्वच्छतेच्या या पवित्र कार्यात आपला सहभाग नोंदवून आपले घर व परिसर स्वच्छ सुंदर ठेवूया असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.

महिन्याच्या शेवटच्या कार्यालयीन दिवशी सायकलने कार्यालयात यावे
       रोज वाढणारे प्रदूषणाला आळा बसण्यासाठी जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व विभाग व कार्यालयातील अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी महिण्यातील शेवटच्या कार्यालयीन दिवशी कुठलेही वाहन न वापरता सायकल किंवा पायी कार्यालयात येवून प्रदूषण टाळावे, असे आवाहन यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.