राष्ट्रीय सरपंच परिषदेसाठी पिंपळगाव चिलमखाँ सरपंच उज्ज्वला पवार यांची निवड
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटच्या वतीने राज्यभरातील ४८ जिल्ह्यांमधील प्रत्येक तालुक्यातून एका ग्रामपंचायतची निवड राष्ट्रीय सरपंच परिषदेकरिता करण्यात आली आहे. त्यामध्ये देऊळगावराजा तालुक्यातून आदर्श ग्रामपंचायत म्हणून परिचित असलेली पिंपळगाव चिलमखाँ येथील सरपंच उज्ज्वला दीपक पवार यांची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील गावांमध्ये विकास करणे, विविध उपक्रम राबवण्याकरिता तथा विकासात्मक कामासाठी राष्ट्रीय सरपंच परिषदेची निर्मिती एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंट या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहुल कराड व योगेश पाटील यांनी केली आहे. राज्यभरातील ज्या ग्रामपंचायतीने अतिशय उत्कृष्ट काम आपल्या गावात केले आहे, अशा गावच्या सरपंचांची निवड या राष्ट्रीय सरपंच परिषदेसाठी करण्यात आली असल्याचे बुलडाणा जिल्हा समन्वयक गजानन मिरगे यांनी कळवले आहे. पिंपळगाव चिलमखाँ व किन्ही पवार या गट ग्रामपंचायतच्या सरपंच उज्वला पवार यांनी मागील पंचवार्षिकमध्ये पूर्ण पाच वर्ष सरपंच म्हणून काम पाहिले. या काळात त्यांनी विविध विकास कामे करून गावाचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला. गावात होत असलेले दर्जेदार विकास कामे पाहून गावकऱ्यांनी त्यांना पुन्हा सरपंच पदी काम करण्याची संधी दिली. याच कामाचे फलित म्हणून सध्यास्थितीत गावात आदर्श ग्रामचे विविध विकास कामे पूर्णत्वास जात आहे. यासाठी सरपंच उज्वला यांचे पती दीपक पवार हे देखील अतिशय प्रामाणिकपणे मेहनत घेत आहे. गावातील जे पात्र लाभार्थी आहे अशा सर्व नागरिकांना घरकुल मिळवून देणे, शौचालयाचा नियमीत वापर करणे, गावातील २५ ते ३० बचत गटांना ग्रामपंचायतच्या पुढाकाराने राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून प्रत्येकी पाच लाख रूपये प्रमाणे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. तसेच आधुनिक काळानुसार जिल्हा परिषद शाळेत ई- लर्निंगचा संच बसवून देण्यात आला आहे. तांड्यावरील सोयीसुविधापासून वंचित असलेल्या जोशी समाजातील नागरिकांना शिधापत्रिकेचे वाटप करून त्यांना सुध्दा न्याय मिळवून दिला आहे. गावात अंतर्गत सिमेंट रस्ते, सांडपाण्याचे व्यवस्थापन, शालेय विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करणे असे एक ना अनेक उपक्रम उज्वला पवार यांनी आपल्या पहिल्या पंचावार्षिकच्या कार्यकाळात राबवले आहे.
