ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरु करा* जयश्रीताई शेळके यांची रा. प. विभागाकडे मागणी

ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरु करा
* जयश्रीताई शेळके यांची रा. प. विभागाकडे मागणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
   पुर्ण क्षमतेने बससेवा सुरु करण्याबाबत शासनाचे निर्देश असतानाही जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही वाहतुक व्यवस्था सुरु करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बससेवा पूर्ववत सुरु करुन गैरसोय दूर करावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांकडे केली. 
      मागील दीड वर्षांपासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. मागील वर्षी सर्व उद्योग, व्यवसाय, शाळा, महाविद्यालये बंद होते. त्याचबरोबर एस.टी. बससेवाही काही कालावधीपुरती बंद करण्यात आलेली होती. काही महिन्यापासून लॉकडाऊन बंद केल्यानंतर उद्योग व्यवसाय हे पुर्ववत सुरु झाले आहेत. तसेच आता शाळा महाविद्यालयेही सुरु करण्यात आली आहेत. परंतु अद्यापर्यंत बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, बुलडाणा, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, नांदुरा, मोताळा, मलकापूर, जळगाव जामोद या सर्वच तालुक्यांमधील अनेक गावांमध्ये बससेवा सुरु करण्यात आलेली नाही. संस्था, कार्यालये, उद्योग-व्यवसाय, शाळा-महाविद्यालये, मंदिरे हे पुर्ववत सुरु झाल्यामुळे कर्मचारी, नोकरदार, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी व नागरिकांना प्रवास करावा लागतो. जिल्ह्यातील बससेवा अजूनही पुर्ण क्षमतेने सुरु नाही. त्यामुळे जाण्या-येण्यासाठी लोकांना, विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावेळी निवेदन देतांना गणेशराव रिंढे, परसराम रिंढे, प्रा.अनिल रिंढे, कौतिकराव राऊत, हरिदास रिंढे, कार्तिक सवडतकर, राहुल बाजारे, गजानन सुरडकर, किशोर वाघ, महेश म्हस्के, समाधान रिंढे, वंदनाताई कुळे, जया कुळे, विशाल कुळे, निलेश रिंढे, तुषार रिंढे, किशोर वाघ आदी नागरिक उपस्थित होते.

रा. प. कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षा
    पूर्ण क्षमतेने बससेवा सुरु नसल्याचा फटका राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनाही बसला आहे. कित्येक कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. जिल्ह्यातील बससेवा पुर्ववत सुरु झाल्यास नागरिकांसह एस.टी.कर्मचाऱ्यांच्या सुध्दा अडचणी कमी होतील. सर्वच गावांमध्ये विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळांनुसार सकाळी व सायंकाळी मागणीनुसार बसफेऱ्या पुर्ववत सुरु करण्यात याव्यात. तसेच बसफेऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.