रस्ता मिळण्यासाठी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांच्याउपोषणाची पहिल्याच दिवशी लेखी आश्वासनाने सांगता

रस्ता मिळण्यासाठी उपोषणास बसलेल्या शेतकऱ्यांच्या उपोषणाची पहिल्याच दिवशी लेखी आश्वासनाने सांगता
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
    मोताळा तालुक्यातील धामणगाव देशमुख लघू प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राबाहेर शेतकऱ्यांना जाण्यासाठी कायमस्वरुपी रस्ता मिळण्यासाठी कोथळी, लोणघाट, निमखेड शिवारातील शेतकऱ्यांनी ११ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात केली होती. त्या उपोषणाची पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, जिल्हा उपाध्यक्ष यशवंत धाबे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मोबिन अहमद व तहसिलदार करे यांच्या हस्ते जिल्हाप्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाचे पत्र देवून सांगता करण्यात आली.
       धा. देशमुख लघू प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राबाहेरुन शेतात येण्या-जाण्यासाठी शेतकऱ्यांना रस्ता नसल्यामुळे शेतात कपाशी व सोयाबीनचे पीक काढणीस आलेले असतांना काढता येत नाही. धा.देशमुख लघू प्रकल्प १००टक्के भरलेला आहे. हा प्रकल्प होण्यासाधी कोथळी-लोणघाट असा शेतरस्ता अस्तित्वात होता. पाटबंधारे विभागाने सव्र्हे नं.९ मधील लघू प्रकल्पाकरीता संपादीत केलेली आहे. संपादीत केलेल्या जमिनीचे ७/१२ उताऱ्यावरील क्षेत्र मात्र आजही कायम असल्याने एक महिला बुडीत क्षेत्राबाहेरुन असलेल्या शेतरस्ताने संबंधित शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी अडवणूक करीत आहे. परंतु आजरोजीही त्या महिलेने सदर रस्ता अडवूण शेतकऱ्यांना जाण्या-येण्यासाठी मज्जाव करीत असल्याने शेतातील पीक नेण्यास अडचण झाल्याने आर्थिक नुकसान होण्याची भिती निर्माण झाली आहे. रस्ता मिळण्यासाठी  जनार्दन गवारे, लक्ष्मण सरकाटे, कडूबा सावळे, मनोहर सावळे, गिरीधर मंजा, लक्ष्मण कुटे, ज्ञानेश्वर श्रीनाथ, सुरेश श्रीनाथ, हुसनशा मुसाशा, शे.हाशम शे.करीम, अशोक इंगळे, सुधाकर गवारे, लुकमान शाह,  शे.सलीम शे.रहीम, यासीनशा मुसाशा, गणेश वानखडे यांनी सुरु केलेले उपोषण लेखी आश्वासनाने मागे घेतले आहे.