अनुसूचित जाती कल्याण समितीने पोलीस, एसटी व उत्पादन शुल्क विभागांचा घेतला आढावा* विभागातील अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आस्थापना बाबींवर चर्चा* अनुसूचित जाती कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा

अनुसूचित जाती कल्याण समितीने पोलीस, एसटी व उत्पादन शुल्क विभागांचा घेतला आढावा
* विभागातील अनुसूचित जाती प्रवर्गाच्या आस्थापना बाबींवर चर्चा
* अनुसूचित जाती कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा आढावा
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     महाराष्ट्र विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समितीने आज 6 ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला. यामध्ये उद्योग व एमआयडीसी, उत्पादन शुल्क, पोलीस, परिवहन विभागांचा समावेश आहे. यावेळी व्यासपीठावर विधानसभा सदस्य तथा समितीप्रमुख कु. प्रणितीताई शिंदे, विधानसभा सदस्य तथा समिती सदस्य सर्वश्री यशवंत माने, लहू कानडे, लखन मलिक, सुनील कांबळे, नामदेव ससाणे, अरूण लाड, राजेश राठोड आदी उपस्थित होते. तसेच विधानमंडळ सचिवालयातील अवर सचिव प्र. श्री. खोंदले, कक्ष अधिकारी विनोद राठोड, सहा. कक्ष अधिकारी दत्तात्रय बेंगलवार आदीही उपस्थित होते. सभागृहात जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, अप्पर जिल्हाधिकारी धनजंय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते व विभागप्रमुख उपस्थित होते.
     समितीने सर्वप्रथम पोलीस अधिक्षक कार्यालयातंर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची बढती, पदोन्नती, अनुशेष, रिक्त पदे, बिंदुनामावली आदींचा आढावा घेतला. तसेच अनुसूचित जाती प्रवर्गाच्या व्यक्तींवर होणाऱ्या अन्याय विरोधात ॲट्रासिटी कायद्याची अंमलबजावणी, या कायद्यान्वये पिडीतांना देण्यात येणारी आर्थिक मदत, दक्षता समित्यांच्या बैठका, दोषारोपपत्र, गुन्हा सिद्धी प्रमाण आदींचाही आढावा घेतला. तसेच संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक सुचना दिल्या. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती, अनुशेष, पदोन्नतीचा आढावा घेतला. समितीने राज्य परिवहन महामंडळातील अनुसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती, अनुशेष, पदोन्नतीचा आढावा घेतला. उद्योग व एमआयडीसी विभागातंर्गत अनुसूचित जाती प्रवर्गाच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती – जमाती उद्योग प्रोत्साहन योजनेचा आढावा घेत योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना देण्याच्या सूचना दिल्या. बैठकीला सर्व विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.