जिल्हा ग्रंथालयातील ग्रंथप्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद * वाचन प्रेरणादिनानिमित्त उपक्रम

जिल्हा ग्रंथालयातील ग्रंथप्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद 
* वाचन प्रेरणादिनानिमित्त उपक्रम
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
     मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे देशाचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो. यानिमित्ताने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथप्रदर्शनीला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
      डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन दरवर्षी १५ ऑक्टोबर राजी वाचन प्रेरणादिन म्हणून साजरा केला जातो. जिल्हा ग्रंथालयाच्या वतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव यांच्या पुढाकाराने दरवर्षी ग्रंथप्रदर्शनी व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. १४ ऑक्टोबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी डॉ. कलाम व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतीश जाधव, जिल्हा ग्रंथालय संघाचे माजी अध्यक्ष कि. वा. वाघ, विष्णू इंगळे, पंजाबराव निकाळजे यांच्यासह वाचक, अभ्यासीकेतील विद्यार्थी उपस्थित होते. १८ ऑक्टोबरपर्यंत ही प्रदर्शनी सर्वांसाठी सुरु राहणार आहे. कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता, समिक्षण, ऐतिहासीक, पौराणिक अशा विविध वाचन साहित्यासह विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे पुस्तके या ग्रंथप्रदर्शनीत उपलब्ध असून वाचक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, अभ्यासीकेतील विद्यार्थी यांचा या प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सदर ग्रंथप्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी विक्रम सोनुने, धनंजय मरे, सय्यद जाकीर, गजनन जोशी यांनी परिश्रम घेतले.