जळगाव जामोद येथे कर्ज मेळावा उत्साहात

जळगाव जामोद येथे कर्ज मेळावा उत्साहात
 बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
  भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशात 7 ते 15 ऑक्टोंबरपर्यंत क्रेडिट आऊट रीच अभियान राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये दिनांक 14 ऑक्टोंबर रोजी जळगाव जामोद येथे सांस्कृतिक भवन नगर, पालिका हॉल मध्ये दुपारी 12 वाजता उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या अध्यक्षतेखाली व अग्रणी बँक सेंट्रल बँक ऑफ़ इंडियाच्या पुढाकराने लोन मेळाव्याचे उत्साहात आयोजन केले. यामध्ये जळगाव जामोद येथील सेंट्रल बैंक ऑफ़ इंडिया, स्टेट बँक ऑफ़ इंडिया व विदर्भ ककोकण ग्रामीण बँक द्वारे विविध सरकारी योजनांचे कर्ज वाटप केले गेले. या मेळाव्यात सर्व बँकांनी मिळून 2 हजार 399 खातेदारांना 40 कोटी 26 लाख रूपये एवढे कर्ज मंजूर केले. यापैकी बऱ्याचशा खातेदारांना उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले. तर काही खातेदारांना वाहनाच्या चाव्या देण्यात आल्या. 
     याप्रसंगी मंचावर नगर पालिकेचे मुख्याधिकारी सूरज सुर्वे , सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक चंद्रभानु गुप्ता , जिल्हा उद्योग केन्द्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील उपस्थित होते. यावेळी उपविभागीय अधिकारी श्रीमती देवकर म्हणाल्या, बँक लोकांना कर्ज देण्यासाठी सकारात्मक आहेत. कर्जदारांनी सुद्धा कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर योग्य नियोजन करुन व्यवसायासाठीच करावा व परतफेड वेळेवर करावी जेणेकरून पुन्हा कर्ज घेता येईल. आपल्या प्रस्ताविकामध्ये सेंट्रल बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री. गुप्ता म्हणाले, जिल्ह्याचा सीडी अनुपात हा 65 टक्के असून तो आपल्या विभागामध्ये सर्वाधिक आहे. सेंट्रल बँकेने सुटयांच्या दिवशी शिबिर घेवून बचत गटाना कर्ज मंजूर केलेले आहेत. संचालन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक नरेश हेड़ाऊ तर आभार प्रदर्शन अग्रणी बँकेचे विजय गवळी यांनी केले.