येळगाव धरणाच्या स्वयंचलित दरवाजालगत सांडव्याची निर्मिती करा* ॲड.जयश्रीताई शेळके यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी

येळगाव धरणाच्या स्वयंचलित दरवाजालगत सांडव्याची निर्मिती करा

* ॲड.जयश्रीताई शेळके यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी


बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)

   येळगाव धरणाच्या 80 स्वयंचलित दरवाजालगत सांडव्याची निर्मिती करुन पैनगंगा नदीचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव तथा जि.प.सदस्य ॲड.जयश्रीताई शेळके यांनी 1 ऑक्टोंबर रोजी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

   येळगाव हे गाव पैनगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे. येथे पैनगंगा नदीवरच स्व.रा.दे.भोंडे सरकार जलाशय बांधण्यात आलेला आहे. पावसाळ्यामध्ये हा जलाशय पुर्णपणे भरल्यानंतर नदीला दरवर्षी पुर येतो. त्यामुळे नदीकाठी असलेल्या सर्वच शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होते. तसेच धरणावर असलेल्या सांडव्याचे स्वयंचलित दरवाजे एकाच वेळी उघडले जातात. त्यामुळे शेतातील पिकांच्या नुकसानासोबतच शेतातील संपूर्ण माती देखील खरडून वाहून जाते. दरवर्षी उद्भवणाऱ्या या संकटामुळे येळगावसोबतच सव, खुपगाव, किन्होळा या तसेच पैनगंगा नदीकाठच्या इतर गावातील शेतकरी त्रस्त झाले आहे.

    येळगाव तसेच पैनगंगा नदीकाठच्या इतर गावांतील शेतकऱ्यांना व सामान्य नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी येळगाव येथील पैनगंगा नदीचे खोलीकरण करण्यात यावे. तसेच धरणावरील 80 स्वयंचलित दरवाज्यालगत सांडव्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी ॲड.जयश्रीताई शेळके यांनी केली आहे. निवेदन देतांना गजानन गडाख, ज्ञानदेव फसले, समाधान गडाख, सुरेश खडके, गणेश पाटील, दिनकर फसले, विजय गडाख, प्रकाश गडाख, जगन्नाथ काकडे, विलास सोळंकी, सुभाष काकडे, जगन्नाथ साळोख, संजय फसले आदी शेतकरी उपस्थित होते.