* दैव बलवत्तर म्हणून 6 जण वाचले
* देऊलगाव साकर्शा जवळील थरारक घटना
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
खामगाव आगाराची खामगाव ते आलेगाव हि बस देऊळगाव साकर्शा जवळ असलेल्या उतावळी नदीच्या पुलावरून खाली घसरली. सदर घटना आज सोमवार 18 ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजता दरम्यान घडली. घटनेवेळी बस मधून चालक वाहकासह चार प्रवासी बसमध्ये होते मात्र दैव बलवत्तर म्हणून सर्वच जण या घटनेतून बचावले.
घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, चालक इब्राहिम खान व वाहक सोनुने हे आपल्या ताब्यातील बस क्रमांक एम. एच.40. एन-8922 ही बस खामगाव-आलेगांव मार्गे अटाळी, देऊळगाव साकर्शा, मळसुर, आलेगाव घेऊन जात असताना देऊळगाव साकर्शा जवळ उतावळी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने पडलेल्या खड्ड्यांमुळे ही बस पुलाखाली घसरुन पलटी झाली. यावेळी बसमध्ये ४ प्रवाशी तसेच चालक आणि वाहक असे ६ जण बसलेले होते. घटनेची माहिती काही जणांनी देऊळगाव साकर्शा गावात कळविताच सरपंच संदीप अल्हाट, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोदबापू देशमुख, तंटामुक्ती अध्यक्ष बी.एम. राठोड,अरुण गायकवाड, रामचंद्र राठोड, गौरव देशमुख, रमेश काळे, नवल राठोड, इरफान पठाण, शाम शिंदे यांचेसह गावकरी मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली. गेल्या काही वर्षांपासून या पुलाची फार दूरावस्था झालेली आहे. परंतु त्याकडे संबंधित विभाग दूर्लक्ष करीत असल्याचे या घटनेवरून दिसून येते.
