* ‘स्वाभिमानी’चा आक्रमक आंदोलनाचा इशारा
* ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढिगार, घाणीचे साम्राज्य,नागरिकांचे आरोग्य धोक्यात
* शहरात डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव पालिकेचे दुर्लक्ष
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
बुलडाणा शहरात वाढते घाणीचे साम्राज्य व मोठ्या प्रमाणात डासांच्या होणाऱ्या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, एकीकडे सक्तीची करवसुली करायची अन दुसरीकडे नागरिकांच्या मूलभूत सुविधाकडे दुर्लक्ष करायचे ही बाब गंभीर असून तातडीने उपाय योजना न केल्यास नागरपालिकेवर स्वाभिमानाच्या वतीने आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पवन देशमुख व अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख रफिक शेख करीम यांनी दिला आहे.
यासंदर्भात न.पा.उपमुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुलडाणा शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य तयार झाले असून त्याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. नगर परिषद प्रशासनामार्फत नागरिकांकडून घरपट्टी, नळपट्टी, स्वच्छता याकरिता मोठ्या प्रमाणात सक्तीची कर वसुली चालू आहे. परंतु बुलडाणा शहरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजीकडे न.पा. प्रशासनाने मात्र दुर्लक्ष केले आहे. शहरातील प्रामुख्याने राम नगर, जिजामाता नगर, सरस्वती नगर, जोहर नगर, मिर्झा नगर, इक्बाल नगर या नगरांमधील नागरिकांकडून कर भरणा मोठ्या प्रमाणात होतो पण न.पा. प्रशासनाकडून वेळोवेळी नाल्या स्वच्छ केल्या जात नाहीत, तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग लागून घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे व गड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचून राहते यामुळे महामारी, डेंग्यू, टायफॉईड व व्हायरल इन्फेक्शन या सारख्या रोगांना सर्व सामान्य जनतेला सामोरे जावे लागत आहे. नगर परिषद प्रशासन ज्या आत्मयतीने कर वसुलीचे काम करते त्याचप्रमाणे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांच्या आरोग्यासाठी तेवढी तत्परता का दाखवत नाही हा सर्व सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे ? ‘कर वसुली जोरात पण नागरिकांचे आरोग्य कोमात’ अशी म्हणण्याची वेळ बुलडाणेकरांवर आली आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तात्काळ सार्वजनिक ठिकाणच्या कचऱ्याची विल्हेवाट लावावी, नाल्यांची नियमित सफाई करावी, तसेच डेंग्यू सारख्या आजार पसरवणाऱ्या डासांवर फॉगिंग यंत्राद्वारे फवारणी करण्यात यावी. जर नगर परिषद प्रशासनाने तात्काळ वरील बाबींवर कार्यवाही केली नाही तरी या विषयाला घेऊन ‘स्वाभिमानी’ आक्रमक आंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. याप्रसंगी ‘स्वाभिमानी’चे महेंद्र जाधव, दत्तात्रय जेऊघाले, अमोल मोरे, अनंत तुपकर उपस्थित होते.
