* 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर मतदार नोंदणी
बुलडाणा : (एशिया मंच वृत्त)
उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी व भारत निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. तरी मतदार म्हणून नोंदणी झालेली नसलेल्या वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी संधी मिळावी व त्याचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी हा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नागरिक घरबसल्या मतदार नोंदणी, नाव दुरूस्ती, नाव वगळणे आदी सुविधा वोटर हेल्पनलाईन ॲपचा उपयोग करून मिळवू शकणार आहे. तरी नागरिकांनी वोटर हेल्पलाईन ॲपचा उपयोग करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गौरी सावंत यांनी केले आहे. मतदार यादी संक्षिप्त पुर्ननिरीक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परीषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
पुर्व पुर्ननिरीक्षण उपक्रमामध्ये दुबार अथवा समान नोंदणी, एकापेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेद्वारा घरोघरी भेट देऊन तपासणी करणे, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, योग्यप्रकारे विभाग / भाग तयार करणे आदी बाबी 31 ऑक्टोंबर 2021 पर्यंत राबविण्यात येत आहे. एकत्रीकृत प्रारूप मतदार यादी 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीवर दावे व हरकती 1 नोव्हेंबर 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहे. दावे व हरकती 20 डिसेंबर 2021 पूर्वी निकाली काढण्यात येणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 5 जानेवारी 2022 रोजी करण्यात येणार आहे.
तरी सदर कालावधीमध्ये मतदार यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करणे, नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे आदी प्रकारची कामे होणार असल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीमती गौरी सावंत यांनी केले आहे.
