पाणी व चारा टंचाई रोखण्यासाठी आतापासूनच नियोजन करा! – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव* ‘जी रामजी’ योजनेतून चारा लागवड व जलसंधारणाला प्रोत्साहन ; मुरघास निर्मिती, पाणीपुरवठा आणि चारा साठवणुकीवर भर

पाणी व चारा टंचाई रोखण्यासाठी आतापासूनच नियोजन करा! – केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव
* ‘जी रामजी’ योजनेतून चारा लागवड व जलसंधारणाला प्रोत्साहन ; मुरघास निर्मिती, पाणीपुरवठा आणि चारा साठवणुकीवर भर
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई व चारा टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे. ‘जी रामजी’ योजनेच्या माध्यमातून चारा लागवड व जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देऊन सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले.
     जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणीटंचाई व चारा व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे, माजी आमदार संजय रायमुलकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीतील महत्त्वाचे निर्देश :

* चारा लागवडीचा आढावा :              शेतकऱ्यांना वितरित केलेल्या चारा बियाण्यांची पेरणी झाली की नाही, याची कृषी सहाय्यक व तलाठ्यांमार्फत तपासणी करावी. लागवड क्षेत्राची तालुकानिहाय माहिती आठ दिवसांत सादर करावी.

* पीक अवशेषांचा वापर : सोयाबीन, तूर व अन्य पिकांचे कुटार संकलित करून पशुखाद्यासाठी वापरावे. उपलब्ध चाऱ्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत पशुपालकांना मार्गदर्शन करावे.
* मुरघास निर्मितीवर भर : चारा संवर्धन, योग्य साठवणूक आणि मुरघास निर्मितीसाठी प्रशिक्षण व जनजागृती करावी.
* रब्बी चारा लागवड : सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी ज्वारीसह अन्य चारा पिकांची लागवड करावी. * चारा छावण्यांची पूर्वतयारी : भविष्यात चारा छावण्यांची गरज भासू शकते. त्यामुळे प्रशासनाने आतापासूनच तयारी ठेवावी.

* जलसंधारणाच्या कामांना गती द्या
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नद्यांचे खोलीकरण, तलावांतील गाळ काढणे, नाले खोलीकरण, शेततळ्यांची निर्मिती आणि माथा ते पायथा जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत. पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरविण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जाधव यांनी दिले.
पाणीपुरवठा यंत्रणा सज्ज ठेवा
जिल्ह्यातील पाणी शुद्धीकरण केंद्रांची स्वच्छता करून ती कार्यान्वित ठेवावीत. पाणी व वीजपुरवठ्याचे नियोजन, तसेच इलेक्ट्रिशियनची उपलब्धता सुनिश्चित करावी. पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी, चारा आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांना प्राधान्य देऊन सर्व विभागांनी जबाबदारीने काम करावे. शासनाच्या योजनांची माहिती शेतकरी व नागरिकांपर्यंत वेळेत पोहोचवावी, असे आवाहनही केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.