प्रा. डी.एस. लहाने यांच्या संकल्पनेत शिवसाईवर संवाद मेळावा* पडझडीनंतर उभा राहतो तोच खरा लढवय्या - जयश्रीताई शेळके

प्रा. डी.एस. लहाने यांच्या संकल्पनेत शिवसाईवर संवाद मेळावा
* पडझडीनंतर उभा राहतो तोच खरा लढवय्या - जयश्रीताई शेळके
​बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        ज्यांना विजयाची व्यसने जडली आहेत ते प्रसंगी अपयशी ठरतात. परंतु मनुष्याची खरी शक्ती पडझडीनंतर दिसते ; जो लवचिकता दाखवतो आणि पराभवाची चिंता न करता पुन्हा उभा राहतो, तोच खरा लढवय्या असे प्रतिपादन शिवसेना राज्य प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी केले. 

           अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकाल नुकताच लागला. या प्रश्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार डी. एस. लहाने यांच्या संकल्पनेत पारिवारिक संवाद मेळावा शिवसाई युनिव्हर्सल येथे आज 1 नोव्हेंबर रोजी पार पाडला. यावेळी त्या बोलत होत्या.
          ​पुढे बोलतांना जयश्रीताई शेळके म्हणाल्या, जे कामी येतात त्यांच्यापुढे हात जोडावे, परंतु ज्यांची लायकी नसेल त्यांच्याकडे कधीही जाऊ नये. आपला प्रवास अंतिम ध्येयाकडे आहे. प्रा. लहाने सराना कोणतीही मोठी आर्थिक पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वतःचे विश्व उभे केले. निवडणुकीतील पराभव ही फार मोठी गोष्ट नाही, कारण आपण अंतिम ध्येयाचे प्रवासी आहोत आणि शिवसेना ही लढवय्यांची संघटना आहे असे सांगितले.

*​ कार्यकर्त्यांच्या डोळ्यातील पाणी हीच मोठी कमाई : जालिंदर बुधवत

       ​शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कार्यकर्त्यांच्या व प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातील पाणी हीच प्राध्यापक लहाने सरांची सर्वात मोठी कमाई आहे. मी ३५ वर्षांपासून संघर्ष करत आलो आहे, अद्याप मैदान सोडलेले नाही.लढत राहू, काम करत राहू, उद्या यश नक्की मिळेल. योग्य वेळी प्रत्येकाचा हिशोब देखील चुकता केला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

* ​महाआघाडीतील नेत्यांच्या भूमिकेवर शेळकेचीं टीका
        ​राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांनी आपल्या भाषणात, काही नेत्यांनी बुलढाण्याच्या पदरात अपयश टाकण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप केला. दोन-दोन रनिंग आमदार असताना पाचपैकी एक जागा शिवसेनेला सोडली असती तर आघाडी तुटली नसती, मात्र काहींना ते मान्य नव्हते आणि त्यांनीच यात खोडा घातल्याचे सांगितले. याप्रसंगी गजानन धांडे व इतर मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले.

* ​भावूक होत प्रा.लहाने यांनी मानले आभार
​कार्यक्रमाच्या शेवटी भावनिक होत प्रा. डी.एस. लहाने यांनी उपस्थितांचे ऋण व्यक्त केले. पाचही जिल्ह्यांत कमी कालावधीत मोठे नेटवर्क उभे करता आले, ज्याची दखल पक्ष पातळीवर घेतली गेली, हीच माझी खरी कमाई आहे,असे प्रा. लहाने म्हणाले. परिसरातील नागरिक, कार्यकर्ते व कर्मचाऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे हा संवाद मेळावा कौटुंबिक सोहळ्यासारखा पार पडला.