बुलढाण्यात ‘रन फॉर युनिटी’ उत्साहात ; हजारो नागरिकांचा सहभाग
* पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज) भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधून बुलढाणा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भव्य ‘रन फॉर युनिटी’ (राष्ट्रीय दौड) चे आयोजन करण्यात आले. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वात पार पडलेल्या या उपक्रमात हजारो नागरिक, विद्यार्थी, पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
रविवारी सकाळी ७ वाजता पोलीस कवायत मैदान येथून या दौडला सुरुवात झाली. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडचे उद्घाटन केले. पोलीस कवायत मैदान येथून कारंजा चौक, एडेड चौक, नवीन पोलीस अधीक्षक कार्यालय आणि त्रिशरण चौक मार्गे ही दौड पुन्हा पोलीस कवायत मैदानावर पोहोचली.
या उपक्रमात व्ही.डब्ल्यू. फाऊंडेशन, ध्येय फाऊंडेशन, निसर्ग मित्र ग्रुप, रणरागिणी ग्रुप, बुलढाणा सायकलिंग ग्रुप, ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर ग्रुप, एडेड स्कूल, एसबीआय बँक रनिंग ग्रुप तसेच रामरक्षा इंग्लिश स्कूल (पाडळी) येथील विद्यार्थी, शिक्षक व सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या पत्नी गीतांजली तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पोलीस अधीक्षक तांबे यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व विशद केले. त्यानंतर उपस्थित पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी राष्ट्रीय एकात्मता व देशाच्या अखंडतेची शपथ घेतली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) रवी राठोड यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार निलेश रत्नपारखी यांनी केले, तर आभार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांनी मानले.
राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि देशाच्या अखंडतेचा संदेश देणारी ही दौड बुलढाणेकरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे विशेष लक्षवेधी ठरली.
