बुलढाण्यात खाद्यतेल रिपॅकिंग आस्थापनेवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई!
* बालाजी इंडस्ट्रीजचा ११.२१ लाखांचा खाद्यतेल साठा जप्त; अन्न व्यवसाय परवाना निलंबित
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
सण-उत्सव विशेष मोहीम २०२६ अंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने बुलढाणा येथील बिरसिंगपूर परिसरातील मे. बालाजी इंडस्ट्रीज या खाद्यतेल रिपॅकिंग आस्थापनेवर बुधवारी (२८ ऑक्टोबर) कारवाई केली. तपासणीदरम्यान अस्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांमधील विविध त्रुटी आढळून आल्याने आस्थापनेचा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात येत असून, सुमारे ६ हजार २२६ किलो खाद्यतेलाचा, एकूण ११ लाख २१ हजार ७५६ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणीदरम्यान रिफाइंड सोयाबीन तेल आणि रिफाइंड सूर्यफूल तेलाचे नमुने विश्लेषणासाठी घेतले. त्यानंतर विश्लेषण अहवाल प्राप्त होईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
* जप्त केलेल्या खाद्यतेलाचा तपशील :
जप्त साठ्यामध्ये ३ हजार ७७१.२६ किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा समावेश असून, त्याची किंमत ६ लाख ६३ हजार ६३ रुपये आहे. तसेच २ हजार ४५५.४० किलो रिफाइंड सूर्यफूल तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ४ लाख ५८ हजार ६९३ रुपये आहे. या दोन्ही प्रकारच्या खाद्यतेलाची एकूण किंमत ११ लाख २१ हजार ७५६ रुपये आहे.
* तपासणीत अन्नसुरक्षेतील अनेक त्रुटी उघड :
आस्थापनेच्या तपासणीदरम्यान तांत्रिक व्यक्ती आणि FoSTaC प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध नसल्याचे आढळले. याशिवाय कीटक नियंत्रण कार्यक्रम, अन्न सुरक्षा व्यवस्थापन आराखडा, टाक्यांच्या स्वच्छतेचे अभिलेख आणि पॅकिंग साहित्याचे फूड ग्रेड प्रमाणपत्र उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. कच्चे व तयार अन्नपदार्थ पॅलेटवर साठविण्याची आवश्यक सुविधाही आस्थापनेत नव्हती.
विशेष म्हणजे, याच परिसरात भुईमुगाच्या टरफलांपासून ब्रिकेट तयार करण्याचे काम सुरू असल्याने निर्माण होणाऱ्या सूक्ष्म धुळीमुळे खाद्यतेल दूषित होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. तसेच रिपॅक करण्यात आलेल्या खाद्यतेलाची स्वतःच्या प्रयोगशाळेत किंवा NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत तपासणी करून घेतल्याचे पुरावे उपलब्ध नव्हते.
या पार्श्वभूमीवर सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त होईपर्यंत संबंधित खाद्यतेलाचा साठा जप्त ठेवण्यात येणार असून, विश्लेषण अहवालातील निष्कर्षांनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली.
* वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई :
ही कारवाई अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे आणि अमरावती विभागाचे सहआयुक्त (अन्न) एस. डी. केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली, बुलढाण्याचे सहायक आयुक्त (अन्न) प्र. शि. पाटील यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी अ. सं. भोपाळे यांनी केली.
सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या कारवाईमुळे खाद्यतेलाच्या साठवणुकीपासून ते पॅकिंगपर्यंतच्या प्रक्रियेत अन्नसुरक्षा नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
