गोतमारा येथे ५ एकर सोयाबीनच्या गंजीला आग; शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान
* अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय; विष्णू कांडेलकर यांना उपचारासाठी बुलढाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल
मोताळा : (एशिया मंच न्यूज )
तालुक्यातील गोतमारा येथील शेतकरी विष्णू कांडेलकर यांच्या शेतातील पाच एकरांतील सोयाबीनच्या गंजीला आज 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अज्ञात व्यक्तीने आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याचे समजल्यानंतर शेतकरी विष्णू कांडेलकर यांना मोठा मानसिक धक्का बसल्याचे समजते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने बुलढाणा येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
एकीकडे दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. पावसाच्या अनिश्चिततेमुळे आणि शेतीतील वाढत्या खर्चामुळे शेतकरी आधीच चिंतेत असताना, सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याच्या या घटनेने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
शेतात दिवसरात्र मेहनत करून पिकविलेल्या सोयाबीनचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. या घटनेमागे नेमके काय कारण आहे, आग कोणी लावली का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर कारवाई करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे गोतमारा परिसरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
