जंगलात फेकलेल्या मसाल्याच्या साठ्याप्रकरणी FDAची पोलिसांत तक्रार
* दोन कोटींच्या साठ्याच्या दाव्याची सत्यता तपासणार; मालकी, किंमत आणि विल्हेवाटीबाबत चौकशीची मागणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
देऊळगाव राजा परिसरातील जंगलात मसाल्याचा मोठा साठा फेकून दिल्याच्या वृत्ताची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) या प्रकरणाच्या चौकशीसाठी पुढाकार घेतला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय संजय भोपाळे यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
प्रसारमाध्यमांमध्ये जंगलात फेकण्यात आलेल्या मसाल्याच्या साठ्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या साठ्याची प्रत्यक्ष मालकी कोणाची आहे, त्याचे प्रमाण व बाजारमूल्य किती आहे, तसेच तो मुदतबाह्य होता का, याची पडताळणी होणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने तक्रारीत नमूद केले आहे. संबंधित साठ्याची पूर्वीची साठवणूक आणि त्याची विल्हेवाट कोणत्या परिस्थितीत लावण्यात आली, याचाही तपास करण्याची विनंती करण्यात आली आहे.
जप्त साठ्याशी संबंध आहे का?
यापूर्वी मे. जनता सेवा मिरची मसाला इंडस्ट्रीज, पिंपळनेर येथील तपासणीदरम्यान जप्त करण्यात आलेला साठा सुरक्षित असल्याचा खुलासा संबंधित आस्थापनेने प्रशासनाकडे सादर केला आहे. त्यामुळे जंगलात फेकण्यात आलेला मसाल्याचा साठा आणि पूर्वी जप्त केलेला साठा यांचा परस्परांशी काही संबंध आहे का, याचीही चौकशी होणार आहे.
तसेच जंगलात फेकलेल्या मालाची विक्री, फेरपॅकिंग किंवा अन्य मालात मिसळून त्याचा पुन्हा वापर करण्याचा प्रयत्न झाला होता का, या शक्यतेचाही तपास करण्याची मागणी अन्न व औषध प्रशासनाने केली आहे.
तथ्यांच्या आधारे कारवाईची मागणी
या प्रकरणात पर्यावरणाच्या दृष्टीनेही आवश्यक तपास करण्यात यावा आणि चौकशीत निष्पन्न होणाऱ्या तथ्यांनुसार संबंधितांवर लागू कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी विनंती पोलिसांकडे करण्यात आली आहे. तपासातून आवश्यक बाबी निष्पन्न झाल्यास गुन्हा नोंदविण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
* जंगलात फेकलेल्या मसाल्याच्या साठ्याचे नेमके वास्तव काय, त्याची किंमत किती आणि त्याचा पूर्वी जप्त करण्यात आलेल्या मालाशी संबंध आहे का, हे आता पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.
* अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, बुलढाणा
