प्रदीप जाधव आत्महत्या प्रकरणात जे.पी. गर्ग यांना उच्च न्यायालयाचा दणका!* अटकपूर्व जामीन फेटाळला; सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी १० दिवसांची मुदत

प्रदीप जाधव आत्महत्या प्रकरणात जे.पी. गर्ग यांना उच्च न्यायालयाचा दणका!
* अटकपूर्व जामीन फेटाळला; सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी १० दिवसांची मुदत
पालघर : (एशिया मंच न्यूज)
           विराज प्रोफाइल्स प्रा. लि. कंपनीतील वरिष्ठ कार्यकारी प्रदीप एस. जाधव यांच्या आत्महत्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.पी. गर्ग यांना मोठा दणका दिला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत करण्यात आलेले छळाचे आरोप, कथित हस्तलिखित राजीनाम्याचे प्रकरण आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने गर्ग यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांनी २८ ऑक्टोबर २०२६ रोजी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी गर्ग यांना १० दिवसांची अंतरिम मुदत देण्यात आली आहे.
प्रदीप जाधव यांनी १९ जून २०२६ रोजी बोईसर येथील विराज प्रोफाइल्स प्रा. लि. कंपनीतील कथित जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.पी. गर्ग यांच्याविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने यापूर्वी गर्ग यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. या निर्णयाला आव्हान देणारे त्यांचे फौजदारी अपील मुंबई उच्च न्यायालयानेही फेटाळले.
       फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, प्रदीप जाधव हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याने त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात येत होते. या अन्यायामुळे त्यांनी २०२५ मध्ये कंपनीचा राजीनामा देत अन्य कंपनीत नोकरी स्वीकारली होती. मात्र, कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी पुन्हा कामावर येण्याची विनंती केल्यानंतर ते २७ डिसेंबर २०२५ रोजी विराज प्रोफाइल्समध्ये रुजू झाले. त्यानंतरही त्यांचा मानसिक छळ व अपमान करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
        या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(r), ३(१)(s) आणि ३(२)(v) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

* आत्महत्येच्या चिठ्ठीतील आरोपांची न्यायालयाकडून दखल
         या प्रकरणातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रदीप जाधव यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मुंबई उच्च न्यायालयाने या चिठ्ठीतील मजकुराची काळजीपूर्वक दखल घेतली. जे.पी. गर्ग यांच्याकडून वारंवार छळ आणि अपमान होत असल्याचे तसेच आपल्यातील चुका शोधून त्या व्यवस्थापकीय संचालकांपर्यंत पोहोचविण्याच्या माध्यमातून आपल्याविरोधात चुकीचे राजकारण केले जात असल्याचे प्रदीप जाधव यांनी चिठ्ठीत नमूद केल्याचे न्यायालयीन निरीक्षणातून समोर आले आहे.
     या आरोपांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे या प्रकरणातील तपास आणि संबंधित पुराव्यांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

* ‘पतीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा द्या!’
        दरम्यान, प्रदीप जाधव यांच्या पत्नी वंदना जाधव यांनी पतीच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे न्यायाची मागणी करत जे.पी. गर्ग यांना तातडीने अटक करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
          विराज प्रोफाइल्सचे मालक नीरज कोचर हे जे.पी. गर्ग यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही जाधव कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी कुटुंबीयांची मागणी आहे.
         
* पुढील कायदेशीर कारवाईकडे लक्ष
        मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यामुळे जे.पी. गर्ग यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी वाढल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी देण्यात आलेली १० दिवसांची अंतरिम मुदत, त्यानंतरची न्यायालयीन प्रक्रिया आणि पोलिसांचा पुढील तपास याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
       प्रदीप जाधव यांच्या मृत्यूमागील नेमकी कारणे, तक्रारीतील आरोपांची सत्यता आणि संबंधितांची जबाबदारी तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. जाधव कुटुंबीयांना न्याय मिळणार का आणि या प्रकरणात पुढे कोणती कारवाई होणार, याबाबत पालघर परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे.